पुणे : अनेक वर्षे चर्चेत असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ३८़७ कोटी आणि हडपसर टर्मिनलसाठी २३़९४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे़ त्यामुळे पुणे स्टेशनच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे़ याशिवाय, पुणे-दौंड मार्गावरील दोन स्टेशनमधील इंटरमिडिएट ब्लॅक हट या १६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे़याबाबत पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक बी़ के. दादाभोय यांनी सांगितले, की पुणे रेल्वे स्टेशनच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाला या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे़ ३८़७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशनमधील सर्व प्लॅटफॉर्मची लांबी २६ डब्यांच्या गाड्या उभ्या करता येतील, इतकी होणार आहे़ सध्या केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वरच २६ डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात़ त्यामुळे अधिक डब्यांच्या गाड्या आल्यास हे दोन प्लॅटफॉर्म रिकामे नसतील, तर त्या गाड्यांना स्टेशनबाहेरथांबून राहावे लागते़ सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्यानंतर या गाड्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नेता येणे शक्य होणार आहे़ त्याशिवाय, येथील सिग्नल व्यवस्थेत बदल होणार असल्याने गाड्यांचा वेग वाढेल़ सध्या पुणे स्टेशनवर दररोजच्या १५६ गाड्या आणि २० मालगाड्या या ठिकाणाहून जातात़ हा प्रकल्प ४ ते ५ वर्षांत पूर्ण होईल़ पुणे स्टेशनवर नव्या गाड्यांसाठी जागा नसल्याने पुणे विभागाने हडपसर टर्मिनलसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविला होता़ त्याला अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे़ आणखी २ लुप लाईन वाढविण्यात येणार आहेत. २ नवीन प्लॅटफॉर्म करणार आहेत़ येथे २६ डब्यांच्या दोन गाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतील़ येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे गाड्या सोडणे शक्य होणार आहे़ पुण्याची एसएमएस सुविधा होणार देशभरपुणे विभागाने रेल्वेगाड्यांमध्ये अस्वच्छता असेल तर एसएमएस करून कळवा, तातडीने गाडीत स्वच्छता केली जाईल, अशी योजना सुरु केली होती़ ही योजना देशभर लागू करण्यात येणार आहे़ पुणे-मिरज लोंडा या ४६७ किमी मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ हे काम लोंडापासून सुरू होणार की पुण्यापासून, याच्या सूचना मिळालेल्या नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले़ १० ठिकाणी होणार उड्डाणपूलपुणे विभागातील १० ठिकाणी रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्यास अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे़ त्यात पुणे-लोणावळ्यादरम्यान एक फाटक, पुणे-मिरजेदरम्यान ५ , पुणे-दौंडदरम्यान १, मिरज-कोल्हापूरदरम्यान १ आणि मिरज-हुबळीदरम्यान १ फाटक बंद करण्यात येणार आहे़ या ठिकाणी राज्य शासनाच्या सहकार्याने उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे़ या फाटकांदरम्यान रेल्वेगाड्यांचा वेग कमी करावा लागतो़ फाटक बंद झाल्याने गाड्याचा वेगही वाढण्यास मदत होईल़ पुणे विभागातील कोल्हापूर ते वैभववाडी आणि कऱ्हाड ते चिपळूण या यापूर्वीच मंजूर करण्यात आलेल्या मार्गांसाठीही यंदाही तरतूद करण्यात आली आहे़ पुणे-लोणावळा तिसऱ्या मार्गासाठी ७५ कोटी रुपयेपुणे : पुणे-लोणावळ्यादरम्यानच्या तिसऱ्या मार्गासाठी मागील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती़ सुमारे ८०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामुळे या मार्गाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे़ दौड टर्मिनलवरील दौंड-मनमाड हा मार्ग पुणे-दौंड या मुख्य मार्गाला जोडण्याच्या १९ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे़ या प्रकल्पामुळे पुण्याहून सुटणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात खूप वेळ वाया जातो़ तो कमी होणार आहे़
पुणे स्टेशनचा पुनर्विकास अन् हडपसर टर्मिनलला मंजुरी
By admin | Published: February 26, 2016 4:32 AM