पुणे: राज्य नोंदणी व मुद्रांक कार्यालयातर्फे येत्या ३१ मार्च किंवा १ एप्रिल रोजी रेडीरेकरनचे (वार्षिक बाजार मूल्य) दर जाहीर केले जाणार आहेत. राज्य शासनाकडून रेडीरेकनर संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात आली असली तरी यंदा जुन्याच पध्दतीने हे दर प्रसिध्द होतील.त्यामुळे दर वाढ झाल्यास राज्य शासनाला हस्तक्षेप करून त्यात घट करावी लागणार आहे. घर आणि जमिनी खरेदी- विक्री व्यवहारात महत्त्वाच्या मानल्या जाणा-या रेडीरेकनरचे दर निश्चित करण्याच्या पद्धतीवर बांधकाम क्षेत्राकडून आक्षेप घेतले जातात. तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यातील तरतुदीनुसार रेडीरकनरच्या दरात केवळ वाढच होते . त्यामुळे बांधकाम व्यवसायात मंदी आली.परिणामी बांधकाम व्यावसायिकांकडूनही नेहमीच रेडीरेकरनचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती . अखेर राज्य शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात सुधारणा केल्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाने जाहीर केलेल्या दरात राज्य शासनाला हस्तक्षेप करणे शक्य झाले आहे. परंतु, दर निश्चितीपूर्वी नोंदणी व मुद्रांक विभागाला शासनाकडून अद्याप कोणत्याही सुचना प्राप्त झालेल्या नाहीत.त्यामुळे जुन्याच पध्दतीने दर जाहीर केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रेडीरेकनरचे दर कमी होणार असल्याने त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे.परंतु,नोंदणी व मुद्रांक विभागाकडून दर जाहीर झाल्यानंतर शासनाकडून त्यात घट सुचविली जाईल. परिणामी त्यास काही कालावधी लागेल.त्यामुळे दर जाहीर झाल्यानंतर शासनाने त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा केली जात आहे. ----------------------रेडीरेकनर जाहीर करण्याचे अधिकार नोंदणी व मुद्रांक कार्यालयाचे आहेत. त्यानुसार दर निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 31 मार्च किंवा 1 एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर प्रसिध्द केले जातील. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात सुधारणा झाली असून त्यानुसार शासनान या दरात घट करू शकते.- अनिल कवडे, नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक ,महाराष्ट्र राज्य
रेडीरेकनरचे दर जुन्या पध्दतीने प्रसिध्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:23 PM
दर निश्चितीपूर्वी नोंदणी व मुद्रांक विभागाला शासनाकडून अद्याप कोणत्याही सुचना प्राप्त झालेल्या नाहीत.त्यामुळे जुन्याच पध्दतीने दर जाहीर केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठळक मुद्देरेडीरेकनरचे दर कमी होणार असल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार