पुणे : मुद्राकं विभागाने रेडीरेकनच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ केली असून, गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात कमी दर वाढ ठरली आहे. कोकण विभागातील ठाणे, मिराभाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपुरमध्ये सर्वाधिक २० टक्के, तर नाशिक जिल्ह्यात सार्वंत कमी ५.४९ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. पुणे शहरात १४, तर पिंपरीत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. नवे दर एक जानेवारी २०१५ पासून लागू झाले असल्याने, त्या प्रमाणात सदनिकांच्या दरातही वाढ होणार आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी राज्यातील रेडीरेकनरचे दर जाहीर केले. राज्यातील ४२ हजार १८४ गावात सरासरी १४.६७, महापालिका हद्दीलगतच्या २ हजार १९८ गावांत १४.२४, तर २३५ नगरपरिषद व नगर पंचायतीत १२.९७ टक्के दराने रेडीरेकनरच्या दर वाढले आहेत. तसेच २६ महापालिकेत सरासरी १३.६८ टक्के दराने वाढ करण्यात आली आहे. या विषयी माहिती देताना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक परदेशी म्हणाले, गेल्या वर्षी नोंदणी झालेले व्यवहार, प्रॉपर्टी एक्झिबिशन, मालमत्ता खरेदी-विक्री विषयक माहिती देणारे संकेतस्थळ, वर्तमानपत्रात येणाऱ्या मालमत्तेच्या जाहीराती, स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष बाजारभावांची चौकशी करुन घेण्यात आलेल्या दरांच्या आधारे रेडीरेकनरचे दर ठरविण्यात आले आहेत. यानुसार बाजार भाव व सरकारी दर यांचा मेळ घालण्यात आला आहे. उलट गेल्या पाच वर्षांतील ही सर्वांत कमी दर वाढ आहे. राज्यात २०११ साली १८, २०१२ साली ३७, २०१३ रोजी २७, तर २०१४ साली २२ टक्के दर वाढ करण्यात आली होती.राज्यात एकूण २७ हजार मूल्य विभाग आहे. या विभागनिहाय रेडीरेकनरचे दर वेगवेगळे आहेत. या दरात अधिक अचूकता यावी या साठी त्या प्रमाणात पदे भरण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. या शिवाय औंध येथे सॅटेलाईट इमेजचा वापर करुन प्रत्यक्ष ठिकाणाची पाहणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित मालमत्तेच्या ठिकाणची परिस्थिती लक्षता येईल. त्यामुळे मालमत्तेच्या शेजारी नाला आहे की मॉल हे समजल्यास मालमत्तेच्या दराचा अधिक अचूक अंदाज बांधता येईल, असे परदेशी यांनी स्पष्ट केले. शेवटच्या दोन दिवसांतील मुद्रांक आकारणी जुन्या दरानेचनवीन वर्षांच्या सुरुवाती पासून नवीन रेडीरेकनरचे दर लागू होणार असल्याने ३० व ३१ डिसेंबर रोजी नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परिणामी ‘ग्रास’ संकेतस्थळ हँग झाल्याने अनेकांना दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. मात्र असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जावू नये, कारण या दस्तावर स्वाक्षरी झाली असल्यास त्यांना जुन्या दरानेच मुद्रांक व नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत ग्रास वापर कर्त्यांची संख्या वाढल्याने संकेतस्थळ हँग झाले होते. मात्र ३१ डिसेंबर पुर्वी दस्तावर सही झाली असल्यास व मुद्रांक शुल्क भरण्याची कार्यवाही झाली असेल मात्र दस्त नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांना २०१४ च्या बाजार मुल्यानुसारच मुल्यांकन केले जाईल. तसेच ३१ डिसेबंरला दस्तावर स्वाक्षरी झालेली असेल व मुद्रांक शुल्क भरणे शक्य झाले नसल्यास त्यांनी एक जानेवारी रोजी शुल्क भरल्या जुन्या दरानेच आकारणी केली जाईल. - श्रीकर परदेशी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक
रेडीरेकनरचे दर कोेकणात सर्वाधिक, तर नाशिकमध्ये कमी
By admin | Published: January 02, 2015 1:34 AM