पुणे : राज्यात लागू करण्यासाठी राज्यशासनाने तयार केलेले रेडी रेकनरचे नवे दर हे सध्या बाजारात असलेल्या भावांपेक्षा कमी असल्याचे सत्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे. सध्या घरांसाठी असलेल्या किमतींचे दर हे शासनाच्या रेडिरेकनरच्या दरापेक्षा ६० ते ११३ टक्क्यांपर्यंत जास्त असल्याचे वास्तव या पाहणीतून समोर आले आहे.राज्यात नवे रेडी रेकनरचे दर लागू करण्याच्या हालचाली गेल्यावर्षी राज्यशासनाने सुरू केल्या होत्या. प्रचलित दरापेक्षा नवे दर हे जास्त असल्याने राज्यातील घरांच्या किमती मोठया प्रमाणात वाढतील. त्यामुळे मागणी घटेल आणि बांधकाम व्यावसायावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी ओरड करण्यात आली होती. त्यामुळे राज्यशासनाने १ जानेवारीपासून हे नवे दर लागू करण्याचा निर्णय थांबविला होता आणि १ एप्रिलपासून हे नवे दर राज्यात लागू होतील, असे स्पष्ट केले होते.याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी म्हणाले, राज्यशासनाने काढलेले नवे रेडी रेकनरचे दर हे खरोखरच जास्त आहेत का, याची सत्यता पडताळण्याचे काम राज्यशासनाने हाती घेतले होते. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुणे, मुंबई, ठाणे आदी भागांमध्ये पाहणी करण्यास सुरूवात केली होती. या भागांमध्ये गृहप्रकल्पांसंदर्भात भरविण्यात आलेल्या मेळाव्यांमध्ये विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली आणि घरांच्या किमतींचे दर काढले. या दरांचा आणि नव्या प्रस्तावित रेडी रेकनरच्या दरांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात दिसून आले की, सध्या बाजारात घरांच्या असलेल्या किमती या प्रस्तावित रेडी रेकनर दरापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. पुणे आणि ठाणे जिल्हयात बाजारातील घरांच्या किमती या प्रस्तावित रेडिरेकनरच्या दरापेक्षा ६० ते ७० टक्क्यांनी अधिक आहेत तर मुंबईत ही टक्केवारी सर्वाधिक ११३ टक्के असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)
बाजारभावापेक्षा रेडी रेकनरचे दर कमीच
By admin | Published: March 04, 2016 12:24 AM