पुणे : महापालिकेने अचानक वाढवलेल्या शुल्कावरून तसेच वाढीव दंड आकारणीवरून प्रशासन व पथारीवाले यांच्यात जुंपली आहे. उद्या यावर चर्चा होणार असून तोडगा निघत नाही तोपर्यंत शुल्क जमा करू नये अशी भूमिका स्टॉल, पथारीवाले व फेरीवाले यांच्या संघटनांनी घेतली आहे.महापालिकेकडून शहरातील स्टॉल, फेरीवाले व पथारीवाले यांना दैनंदिन शुल्क आकारले जाते. त्याचा दर मध्यंतरी प्रशासनाने अचानक वाढवला. त्याला सर्वसाधारणसभेची मान्यताही मिळाली आहे. दैनंदिन २००, १००, ५० व २५ रुपये असे शुल्क प्रशासनाने निश्चित केले आहे. त्याला जाणीव, दिलासा जनविकास, वंचित विकास, नॅशनल हॉकर्स फेडरेशन, पुणे हॉकर्स सर्व सेवा सहकारी संस्था, पथारी पंचायत, भीमज्योत या संघटनांनी हरकत घेतली आहे. हातावर पोट असलेल्या या गरीब विक्रेत्यांसाठी ही अवाजवी दरवाढ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले.त्यावरून अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी अतिक्रमण विभागाला त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. उद्या दुपारी ३ वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कार्यालयात ही चर्चा होणार आहे.महापालिका रस्त्यावरील या व्यावसायिकांना कसल्याही सुविधा देत नाही. तरीही ते शुल्क देतात, तर महापालिकेने त्यात अवाजवी वाढ केली आहे. दंड म्हणून १० ते १५ हजार रुपये जमा करण्याचा नियम म्हणजे या गरिबांवर अन्यायच आहे, असे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते कमी होत नाही तोपर्यंत जमा करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. उद्याच्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही तर हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
शुल्क कमी करा, अन्यथा भरणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:36 AM