Pune | घरपट्टीचे वाढीव ४० टक्के कमी करण्यासाठी पुण्यात काँग्रेसचे प्रभू रामचंद्राला साकडे
By राजू इनामदार | Published: April 12, 2023 02:46 PM2023-04-12T14:46:14+5:302023-04-12T14:49:44+5:30
काँग्रेसने सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी बुधवारी प्रभू रामचंद्राला साकडे घातले...
पुणे : घरपट्टीचे वाढीव ४० टक्के कमी करण्यासाठी मंत्रीमंडळात निर्णय झाला, मात्र त्याची अमलबजावणी व्हायला तयार नाही. ही पुणेकरांची चेष्टाच आहे. ती करू नये असा इशारा देत काँग्रेसने सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी बुधवारी प्रभू रामचंद्राला साकडे घातले. तुळशीबाग राममंदिरात आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते रामारायाची रितसर आरती करण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस संजय बालगुडे व काँग्रसचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार धंगेकर व जोशी म्हणाले, “पुणेकरांना सन १९७० पासून घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. महापालिकेने तसा ठराव मंजूर करून घेतला होता. असे असताना सरकारने ती अचानक बंद केली. प्रशासनाने तत्परतेने मालमत्ताधारकांना बीले पाठवली. त्यात २०१८ पासूनची थकबाकी दाखवली. साधी सदनिका असेल त्यांनाही यातून २० ते २१ हजार रूपयांची वाढीव बीले आली. हा सगळा प्रकारच पुणेकरांच्या सहनशिलतेचे अंत पाहणारा आहे.’’
काँग्रेस सुरूवातीपासून ही वाढीव घरपट्टी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करत असल्याचे बालगुडे म्हणाले. स्वाक्षऱ्यांची मोहिम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्ऱ्यांना निवेदन दिले. मात्र सरकार बधायला तयार नव्हते. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मात्र मंत्री मंडळाने ही वाढीव बीले रद्द करण्यात येतील असे सांगितले. मंत्रीमंडळात तसा निर्णय झाला, मात्र त्याबाबतचा सरकारी अध्यादेश अद्याप काढलाच गेलेला नाही. यावरून आता भारतीय जनता पक्षा पुणेकरांची चेष्टाच करत असल्याचे दिसते आहे अशी टीका बालगुडे यांनी केली.
ही वाढीव बीले तत्काळ रद्द करावी, पुणेकरांची घरपट्टी पूर्ववत व्हावी, तसेच घरपटी थकबाकीदारांवर सावकारी पद्धतीने लावले जात असलेले व्याजही तत्काळ बंद करावे, बील भरण्यास वर्षापेक्षा जास्त विलंब झाला तर व्याज लावण्यात येते व तेही सावकारी दराप्रमाणे नसते. महापालिका प्रशासन तेच करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश जारी करावा, प्रशासनाने त्याची त्वरीत अमलबजावणी करावी अशी प्रार्थना तुळशीबाग रामंदिरात जाऊन करण्यात आली. रामाची आरतीही यावेळी करण्यात आली.