पुणे : आवक वाढल्याने घाऊक बाजारात बहुतेक पालेभाज्या व फळभाज्यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे भाज्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागल्या आहेत. पावसालाही सुरुवात झाल्याने आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक सुमारे २० ट्रक जास्त आहे. तसेच, शहरात रात्रीपासूनच अधून-मधून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाणही कमी राहिले. परिणामी, भाज्यांचे भाव उतरले. भेंडी, टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, आर्वी या भाज्यांचे भाव प्रतिदहा किलोमागे ५० ते ८० रुपयांनी उतरले. दोडका, कारली, ढोबळी मिरचीच्या भावात सुमारे १०० रुपयांची, तर शेवग्याच्या भावात ३०० रुपयांनी घट झाली. मटारचे भावही २५० रुपयांनी कमी झाले. आवक वाढल्याने घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या भावात घट झाली. रविवारी बाजारात सुमारे अडीच लाख जुडी कोथिंबीर, तर सुमारे दीड लाख जुडी मेथीची आवक झाली. मागील काही आठवड्यांतील ही सर्वाधिक आवक आहे. आवक मोठी झाल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीचे भाव शेकडा जुडीमागे २०० रुपयांनी उतरले. मेथीचे भाव स्थिर राहिले. शेपू, कांदापात, करडई, राजगिरा, चुका, चवळई व पालक या भाज्यांच्या भावात २०० ते ३०० रुपयांची घट झाली. तर, मुळ््याचे भाव शेकडा जुडीमागे ८०० रुपयांनी उतरले.रविवारी घाऊक बाजारात मध्य प्रदेशातून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकमधून ८ ते ९ ट्रक कोबी, मध्य प्रदेश व कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून १ ट्रक मटार, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून ४०० ते ४५० गोणी लसूण, आग्रा, इंदौर व गुजरातमधून ५० ट्रक बटाट्याची आवक झाली. स्थानिक भागातून २० ते २२ टेम्पो फ्लॉवर, १० ते १२ टेम्पो कोबी, ५ ते ५.५ हजार पेटी टोमॅटो, ४०० ते ४५० गोणी सातारी आले, ५ ते ६ टेम्पो सिमला मिरची, ५ ते ६ टेम्पो हिरवी मिरची, २०० गोणी भुईमूग शेंग, ६० ट्रक कांद्याची आवक झाली.
पालेभाज्या, फळभाज्यांच्या भावात घट
By admin | Published: July 20, 2015 4:04 AM