लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या अनेक आठवड्यापासून ५.५ च्या खाली येत नसल्याने कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आली नव्हती. मात्र, शुक्रवारी ग्रामीणचा कोरोनाबाधित दर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ४.९ टक्क्यांवर आला आहे. हे चित्र दिलासादायक असून आता निर्बंधातून कधी सूट मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली. जवळपास जिल्ह्यातील प्रत्येक गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. १३ तालुक्यांतील सर्वच गावात कोरोना पसरला होता. फक्त ३४ गावे कोरोनामुक्त राहिली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीणचा बाधित दर हा १४ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यात हॉटस्पॉट गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. हा बाधित दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या खाली येत नव्हती. त्या तुलनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील बाधित दर झपाट्याने कमी झाल्याने त्यांना कोरोना निर्बंधातून सूट मिळाली. मात्र, ग्रामीण भागात निर्बंध कायम होते. हा बाधित दर जुलै महिन्यात ७ टक्क्यांवर आला. मात्र, तो ५ टक्क्यांखाली येत नसल्याने निर्बंधातून ग्रामीण भागाला सूट मिळत नव्हती. यामुळे जिल्हा परिषदेने हॉटस्पॉट गावात तसेच बाधित गावांत धडक सर्वेक्षण मोहीम राबविली. याद्वारे कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आणि प्रत्येक घरात जाऊन घराबाहेर पडणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामुळे बाधित सापडण्याचे प्रमाण वाढले होते. असे असले तरी रुग्णसंख्या काही केल्या कमी येत नव्हती. सध्या जिल्ह्यातील एकूण गावांपैकी सुमारे ४०० गावांत कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जिल्हा परिषदेने दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांत बाधित कुटुंबांतील सर्व सदस्यांची आणि ज्या गावात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत, त्याठिकाणी कोरोना चाचण्या करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.
गेल्या तीन आठवड्यांत या मोहिमेंतर्गत २ लाख ३१ हजार ६७६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. गेल्या चार आठवड्यांपासून ५.५ टक्क्यांवर स्थिरावलेला कोरोनाबाधित दर अखेर शुक्रवारी खाली आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. बाधित दर ५ च्या खाली आला असल्याने निर्बंधातून सूट मिळेल का? याबाबत त्यांना विचारले असता, या संबंधीचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत होईल, असे त्यांनी सांगितले.
चौकट
चार आठवड्यांत २ लाख ३७ हजार ६७६ जणांची तपासणी
ग्रामीण भागातील बाधित दर कमी आणण्यासाठी तसेच हॉटस्पॉट गावांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात धडक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत चार आठड्यांत २ लाख ३७ हजार ६७६ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच हॉटस्पॉट गावात भारतीय जैन संघटनेतर्फे जनजागृती सुरू असून याचाही चांगला परिणाम झाल्याचे भगवान पवार यांनी सांगितले.
----
कोट
ग्रामीण भागाचा कोरोनाबाधित दर हा अनेक दिवसांपासून ५ टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्या ग्रामीण भागाचा बाधित दर हा ४.९ टक्के तर, एकूण जिल्ह्याचा बाधित दर ३.८ टक्के एवढा झाला आहे.
- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी