भिगवण : भिगवण परिसरातील रोडरोमिओ तसेच अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाईनंतर भिगवण पोलिसांनी परिसरातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. बारामती अग्रो साखर कारखान्यावर ६०० वाहनांना परावर्तक पट्ट्या बसविण्याची मोहीम राबविण्यात आली. या वेळी कारखाना परिसरात ड्रायव्हर आणि टोळी मालक यांचे समुपदेशन करण्यात आले.
भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश ढवाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबवली. अनेक कारखान्यावर उसाचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणावर उस कारखान्याकडे नेला जात आहे. यातून अनेक वेळा वाहनाचे अपघात होवून जीवित हानी होण्याचे प्रमाण असते. याचे प्रमुख कारण या वाहनांना पाठीमागच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा रीप्लेकटर नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात पाठीमागच्या बाजूने वाहनाची धडक होण्याचे प्रमाण अधिकचे असते. याबाबतीत काळजी घेण्याची गरज असताना कारखाना प्रशासन आणि आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. यामुळे निष्पाप नागरिकांचे प्राण वेठीस धरले जातात. याचा विचार करून भिगवण पोलीस ठाण्याचे महेश ढवाण यांनी परिसरातील कारखान्याला भेट देत अशा वाहनांना रीप्लेकटर बसविण्याची मोहीम सुरु केली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक सुभाष गुळवे, शेती अधिकारी हरिदास बंडगर, प्रकल्पाचे मुख्य अधिकारी प्रकाश जठार, संदीप चाकणे, शरद भोसले यांनी सहभाग नोंदवला.४या मोहिमेअंतर्गत बारामती अग्रो कारखान्यावरील जवळपास ६०० वाहनांना या प्रकारचे रिपलेकटर बसविण्यात आले. यावेळी ढवाण यांनी ड्रायव्हर लोकांचे समुपदेशन करीत दारू पिऊन वाहने चालवू नयेत, तसेच वाहनाचे वेग कमी ठेवीत टेपचे आवाज कमी ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच वाहतूक नियमाचे पालन करण्याच्या सूचना केल्या.