लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारने शेतकरी कायद्यात केलेल्या तीनही सुधारणा त्याचे स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या आहेत. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडते अशी टीका किशोर ढमाले व सुभाष वारे यांनी केली. स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना त्यांच्यापुढील या संकटाची माहिती करून द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेच्या चौथ्या सत्रात केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर ढमाले आणि प्रा. वारे यांची व्याख्याने झाली. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारच्या या धोरणांना विरोध करणे गरजेचे आहे, मात्र ज्यांच्यावर हे संकट येते आहे त्यांनाच त्याविषयी विशेष माहिती नाही. ती करून देण्याची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांनी स्विकारावी, असे आवाहन दोन्ही वक्त्यांनी केले. अक्षय राऊत यांनी प्रास्तविक केले. बाळानाथ कुचेकर यांनी आभार व्यक्त केले.