लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना असतानाही काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरूच असल्याच्या तक्रारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना असे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये, तसेच शुल्क घेतले असल्यास ते परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची धावपळ सुरू आहे. काही महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरून घेतले जात आहेत, तर काही महाविद्यालयांमध्ये लेखी स्वरूपात अर्ज भरले जात आहेत. या प्रक्रियेमध्ये काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी शुल्क आकारले जात आहे. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये हे शुल्क वेगवेगळे आहे. याबाबत विद्यापीठाकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वी असे शुल्क न आकारण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत काही महाविद्यालयांनी शुल्क आकारणी सुरूच ठेवली असल्याच्या तक्रारी पुन्हा येऊ लागल्या आहेत.याची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी शुल्क न आकारण्याच्या सूचना पुन्हा दिल्या आहेत. तसेच घेतलेल्या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना तातडीने परत करावी, असेही त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठाने प्रवेश अर्जासाठी कोणतेही शुल्क निश्चित केलेले नाही. माहितीपुस्तिकेसाठी आकारायच्या शुल्काचा समावेश प्रवेशानंतर आकारण्यात येणाऱ्या स्टुडंट अॅक्टिव्हिटी शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
माहितीपुस्तिका व अर्जासाठीचे शुल्क परत करा
By admin | Published: June 25, 2017 5:04 AM