पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून खटले वाढले, वकिलांची संख्या वाढली, पक्षकारांची संख्या वाढली़ सायकलवरून सर्व जण दुचाकी, मोटारींवर येऊ लागले. पण पार्किंगच्या जागेत वाढ न झाल्याने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे आवार आणि परिसर हा वाहनांच्या विळख्यात सापडलेला दिसून येत आहे़ शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या चारही बाजूचा परिसर हा सध्या वाहनांनी व्यापलेला दिसून येतो़ काही वर्षांपूर्वी न्यायालयात येणारे वकील, पक्षकार यांची संख्या कमी होती़ त्यातील अनेक जण पायी अथवा दुचाकीने येणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते़ वकिलांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली़ नव्याने वकिली सुरू करणाऱ्यांकडेही वर्षभरात मोटार येऊ लागली़ संचेती हॉस्पिटल ते कामगार पुतळ्यावर ज्याप्रमाणे पार्किंगमुळे रस्त्यावर अनेकदा वाहतूककोंडी होते़ तशीच परिस्थिती अनेकदा कामगार पुतळा ते शिवाजी रोड दरम्यानच्या रस्त्यावर येते़ शिवाजी रोडवरील वाहतुकीच्या ताणामुळे वाहतूक नियंत्रण विभागाने नव्या पुलाकडून येणाऱ्यांना न्यायालयाकडे वळण्यास बंदी घातल्याने आता या रस्त्यावरील वाहतूककोंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे़ नव्या वकिलांना चेंबर नसल्याने हातात केस नसेल तर कोठे थांबायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे येऊ लागला़ बाररूममध्ये गर्दी असल्याने पक्षकारांबरोबर बोलणे अवघड होते़ बाहेर हॉटेलमध्ये बसणे शक्य नसल्याने अनेक वकिलांनी आपली मोटार हेच आॅफिस केले़ दुपारच्या वेळी गाडीत विश्रांती घेणे, पक्षकारांशी चर्चा करणे सोयीचे होऊ लागल्याने अनेकांनी मोटारी घेणे व त्या न्यायालयाच्या परिसरात पार्क करणे सुरु केले़न्यायाधीशांच्या गाड्यांसाठी विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आली आहे़ मात्र, इतरांसाठी कोणतीही व्यवस्था नाही़ जो ज्या दरवाजाने येईल व जेथे जागा मिळेल, तेथे गाड्या लावल्या जातात़ न्यायालयाची रेल्वे मार्गाशेजारील जागा आहे़ सध्या ती पक्षकारांसाठी उपलब्ध करून दिली आहे़ मात्र, याची पक्षकारांना माहिती नसल्याने वकील व इतर लोकच प्रामुख्याने तिथे आपल्या गाड्या लावतात़ ४संचेती हॉस्पिटलकडून कामगार पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्किंग केले जाते़ तेथे प्रामुख्याने वकिलांच्या गाड्या उभ्या असतात़ तरीही जागा अपुरी पडत असल्याने उशिरा येणारे लोक सरळ डबल पार्किंग करताना दिसतात़ त्यामुळे आतमध्ये गाडी लावणाऱ्यांना बाहेरची गाडी कधी काढली जाते, याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर राहत नाही़
न्यायालय परिसर वाहनांच्या विळख्यात
By admin | Published: June 20, 2016 1:26 AM