काकी सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छा, युगेंद्र पाया पडले..! पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 17:19 IST2025-04-22T17:11:34+5:302025-04-22T17:19:28+5:30
वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवार यांना सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा..!

काकी सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छा, युगेंद्र पाया पडले..! पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले…
बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त मंगळवारी (दि. २२) बारामतीत एकाच मंचावर शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत, तर युगेंद्र पवार खजिनदार आणि सुनेत्रा पवार विश्वस्त आहेत. या बैठकीच्या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सुनेत्रा पवारांकडून युगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
युगेंद्र पवार यांचा वाढदिवस असल्याने, सुनेत्रा पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले आणि काकींचा आशीर्वाद घेतला. यावेळी इतर विश्वस्तांनीही पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या. बैठकीदरम्यान दोघेही शेजारी बसले होते आणि त्यांच्यात संवादही झाला.
पवार कुटुंबातील ‘संवाद’ वाढतोय का?
गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबातील संबंधांमध्ये सौहार्द निर्माण होत असल्याचं स्पष्ट होत आहे. जय पवार यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात नुकतीच एक बंद दाराआड बैठकही पार पडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ‘पवारांची पुन्हा एकजूट’ या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.
“जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं” – शरद पवार
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना पत्रकारांनी थेट विचारणा केली की, पवार कुटुंब पुन्हा एकत्र येतंय का? यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. तुम्ही जो उसाच्या उत्पादन वाढीचा प्रश्न उपस्थित केला, त्यावर आम्ही वर्षभर काम करतोय. यासाठी सरकारमध्ये चर्चा करणं गैर नाही.”
त्यांच्या या विधानामुळे ही राजकीय जवळीक तात्पुरती आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने गणित मांडली जात आहेत, यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
राजकीय फेरजुळणीचे संकेत?
पवार कुटुंबातील संवाद, सार्वजनिक एकत्रित उपस्थिती आणि शरद पवार यांची ‘सरकारशी बोलणे गैर नाही’ ही भूमिका, हे सगळं आगामी काळात राज्यातील राजकारणात मोठे बदल घडवू शकते. पवारांच्या ‘राजकीय घराण्याचा’ हा नवीन अध्याय कुठल्या दिशा दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.