बारामती : विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या बैठकीनिमित्त बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार हे एकत्रित आल्याचे पहावयास मिळाले. ज्येष्ठ नेते पवार हे संस्था अध्यक्ष आहेत. तर युगेंद्र हे खजिनदार आणि सुनेत्रा पवार या विश्वस्त आहेत. मंगळवारी (दि. २२) सकाळी बैठकीसाठी सुनेत्रा पवार पोहोचल्या. मात्र तत्पूर्वी युगेंद्र पवारदेखील विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचले होते. सुनेत्रा पवार येताच युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले. युगेंद्र पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काकींचे आशीर्वाद युगेंद्र पवारांनी घेतले.
संस्था बैठकीत यावेळी युगेंद्र पवार यांना सुनेत्रा पवार यांच्यासह इतर विश्वस्त यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बैठकीतही दोघेही शेजारी बसले होते. यावेळी चुलती आणि पुतण्यामध्ये संवाददेखील झाल्याचे दिसुून आले. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार हेही या बैठकीत उपस्थित होते. बारामतीत पवार कुटुंबाच्या वाढत्या जवळिकीबाबत चर्चा जोर धरू पाहत आहेत. गेल्या काही दिवसांत विविध बैठकांत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुडा समारंभात ज्येष्ठ नेते पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
जनतेच्या कामासाठी एकत्र यावे लागते -
पवार कुटुंबीय एकत्र येण्याबाबत मंगळवारी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर शरद पवार म्हणाले, जनतेच्या कामासाठी एकत्र यावे लागतं. तुम्ही जो उसाच्या संदर्भात उत्पादन वाढीचा प्रश्न काढला त्याच्यावर आम्ही वर्षभर काम करीत आहोत. त्यामध्ये सरकार आलं पाहिजे. यासाठी सरकारमध्ये सरकार प्रतिनिधींशी बोलणे काहीही चुकीची गोष्ट नसल्याचे शरद पवार म्हणाले.