रहाटणी/वाकड : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती सोयीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा औंध येथील जिल्हा रुग्णालयातील हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गायब होतात. त्यानंतर रात्री आलेल्या रुग्णांचा केस पेपर काढण्यापासून ते देखभालीची व्यवस्था सुरक्षारक्षकांच्या हाती सोपविण्यात येत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. सुरक्षारक्षकांना रुग्णालयाची सुरक्षा करण्याऐवजी रुग्णसेवकांची भूमिका पार पाडावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’ अशी स्थिती असून, रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे आहे.रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘लोकमत’चे प्रतिनिधी पोहोचले. भव्य व प्रशस्त असलेल्या या रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक तैनात नसल्याचे दिसून आले. केस पेपर काढण्याच्या खिडकीवर गेले असता, काही सुरक्षारक्षक केस पेपर लिहिण्याचे काम करत होते. तर काही जन मोबाइलवर फेसबुक, व्हॉट्सअॅप पाहण्यात दंग होते. या वेळी प्रतिनिधीने केस पेपर खिडकीच्या आत खुर्चीवर बसलेल्या सुरक्षारक्षकाला केस पेपर देण्याची मागणी केली. त्याने जणूकाय केस पेपर देणाराच अधिकृत कर्मचारी असल्याच्या आविर्भावात पेशंट कुठे आहे, त्याला काय झाले, नाव व गाव काय, वय किती अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार केला. त्या वेळी पेशंटच्या पोटात दुखत असून पेशंट घरी आहे, अवघ्या काही मिनिटांत येथे येणार आहे़ त्यामुळे आपण आम्हास केस पेपर द्यावे, अशी मागणी करताच त्याने केस पेपर लिहिण्यास सुरुवात केली. वास्तविक सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत व पुन्हा सायंकाळी चार ते सहा या वेळेत नवीन केस पेपर देणे, जुना केस पेपर काढण्यासाठी कर्मचारी असतात.>या प्रकाराला जबाबदार कोण?या केस पेपर खिडकीच्या शेजारी रुग्णालयातील मनुष्यबळ व्यवस्थापन करणाºया जमादाराची कॅबिन आहे़ मात्र त्या कॅबिनला कुलूप असल्याचे दिसून आले. त्यामुळे एवढ्या मोठ्या रुग्णालयातील व्यवस्थापन कुचकामी असून, येथील कारभार कशा प्रकारे चालतो, असा प्रश्न पडतो. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी व सुरक्षारक्षक एजन्सी या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. रुग्णालय प्रशासनात काम करणाºया कर्मचाºयांना शासनाचा हजारो रुपये पगार असतो, तरी आपल्या जबाबदारीत कसूर करण्याचे धाडस कर्मचारी करताना दिसून येत आहेत. त्यांना कोण पाठिशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.>तेरी भी चूपमेरी भी चूपरात्रपाळीला देखील या कामासाठी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे़ मात्र हे कर्मचारी आपली जबाबदारी व कर्तव्याचे भान न ठेवता या कामाची जबाबदारी सुरक्षारक्षकांच्या माथी मारून स्वत: मात्र बिनधास्त मजा मारत फिरत असल्याचे येथील रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. सुरक्षारक्षक व कर्मचारी दोघेही आपआपली जबाबदारी विसरून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे म्हणत उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात. मात्र, एखादा तातडीचा रुग्ण दाखल झाल्यास सर्वांची धावपळ होते. वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. कोणीही जबाबदारी घेत नाही, अशी माहिती येथील रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.>घटनेनंतर येणार का जाग?जिल्हा रुग्णालयात रात्रभर रुग्णांची व नातेवाइकांची तसेच परिसरातील पोलीस स्टेशनमधील आरोपींची मेडिकल चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. तसेच अपघातात जखमी झालेले रुग्णदेखील तातडीच्या सेवेसाठी दाखल होतात़ मात्र रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कोणत्याच प्रकारची सुरक्षा व सुरक्षारक्षक नसल्याने कधीही ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती या रुग्णालयाची आहे.तुम्ही कधीही आत जा आणि केव्हाही बाहेर पडा तुम्हाला विचारणारा व अटकाव करणारा कोणीही भेटणार नाही़ यातूनच काही अपवादात्मक घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षारक्षक हाकताहेत कारभार, रात्रीच्या वेळेत अधिकारी व कर्मचारी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:26 AM