पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी येत्या १८ जुलै रोजी मुलाखती ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. मात्र, कुलसचिव पदाच्या भरतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने याला उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडून मान्यता मिळू शकलेली नाही. गेल्या सव्वा वर्षापासून कुलसचिव पद रिक्त आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामाचा वेग प्रचंड मंदावला आहे. आता पुन्हा भरती प्रक्रिया रखडली गेल्याने विद्यापीठ प्रशासनाचा गाडा हाकायचा कसा याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत. विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर २२ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र तर १२ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. कुलसचिव पदाच्या मुलाखती घेण्यासाठी नुकतीच एक समिती गठित करण्यास नुकतीच व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली होती. त्यानुसार येत्या १८ जुलै रोजी कुलसचिव पदाच्या मुलाखती घेण्याचे पत्र उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. तत्कालीन कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांची सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त राहिले आहेत. सध्या वर्षभरापासून विद्यापीठाचे प्राध्यापकांकडे प्रभारी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल पवार, प्रा. अजय दरेकर, उपकुलसचिव सुनील अत्रे, श्रीरंग बाठे, मुद्रणालय व्यवस्थापक दत्तात्रय कुटे आदींची नावे कुलसचिव पदासाठी चर्चेत आहेत. न्यायालयात कुलसचिव पदासाठी दाखल असलेल्या याचिका निकाली निघाल्यानंतर अथवा याबाबतची स्थगिती उठविल्यानंतरच कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
कुलसचिव भरतीची प्रक्रिया पुन्हा रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 8:05 PM
न्यायालयात कुलसचिव पदासाठी दाखल असलेल्या याचिका निकाली निघाल्यानंतर अथवा याबाबतची स्थगिती उठविल्यानंतरच कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकणार आहे.
ठळक मुद्देन्यायालयात याचिका : प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हवर्षभरापासून विद्यापीठाचे प्राध्यापकांकडे प्रभारी जबाबदारीकुलसचिव मुलाखतीसाठी २२ उमेदवार पात्र तर १२ जणांचे अर्ज अपात्र