पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविली जाणारी प्रवेश ऑनलाईन आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी राज्यातील ५ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पुण्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ३७३ एवढी आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो.प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत पालकांमध्ये उत्सुकता होती.बुधवारपासून आरटीईचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. येत्या २१ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदत दिली आहे. पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या एकूण १४ हजार ७७३ जागा उपलब्ध असून पहिल्याच दिवशी या जागांसाठी १ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्यात आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या शाळांची संख्या ९ हजार ४३१ एवढी आहे. या शाळांमधील ९६ हजार ६२९ जागांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. राज्यात आरटीईच्या सर्वाधिक जागा पुण्यात असून पुण्यात १ हजार ३७३ तर राज्यात ५ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी ऑनलाईन अर्ज भरला आहे.