न्यायालयाने अकरावी सीईटी रद्द केल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील ३०८ कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी १ लाख १० हजार ५५ जागा उपलब्ध झाल्या आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेसाठी नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत, याबाबतची माहिती येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.
इयत्ता दहावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे. मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी १ लाख ७ हजार जागा उपलब्ध होत्या. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करणा-या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या वाढल्याने प्रवेशाच्या एकूण जागांमध्ये सुमारे तीन हजाराने वाढ झाली आहे. परिणामी दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश मिळणार आहे.
-----------------------
पुणे- पिंपरी चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या : ३०८
अकरावी प्रवेशाच्या एकूण जागा : १,१०,०५५
प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ६५,६५१
अर्ज भरून लॉक करणा-या विद्यार्थ्यांची संख्या : ५२,४३१
भरलेला अर्ज तपासून झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ४९,२३६
महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ३०,५०७