प्रियांका शेळके यांनी पुढाकार घेऊन शिवगर्जना युवा प्रतिष्ठानच्या वतीने नावनोंदणीचा हा उपक्रम हाती घेतला आहे. आयुष्यमान भारत योजना मोफत नावनोंदणी व मोफत कार्ड वाटप कार्यक्रम हाती घेतला आहे. येडगाव, धनगरवाडी, भोरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
आधार कार्ड व पॅन कार्डवरील नंबर लिंक करून ही नावनोंदणी करायची आहे. यासाठी आधार क्रमांक, पॅन क्रमांक, रेशनकार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत. २०११ च्या सामाजिक - आर्थिक जनगणनेनुसार दारिद्रय रेषेखालील यादीतील कुटुंबांची या योजनेसाठी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी १० कोटी गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थ्यांची नोंद राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे करण्यात येणार आहे.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात ही नावनोंदणी करण्यात येत आहे. सरपंच सोमेश्वर सोनवणे व उपसरपंच दिगंबर भोर हे या वेळी उपस्थित होते. नावनोंदणीची प्रक्रिया आयुष्यमान भारतचे समन्वयक संजय जाधव हे पूर्ण करून घेत आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाख रुपयांपर्यंत दर वर्षी विमा संरक्षण असून खासगी हॉस्पिटलमध्ये कॅश लेस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेद्वारे गरीब कुटुंबांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे प्रियांका शेळके यांनी या वेळी सांगितले.
"आयुष्यमान भारत मंत्रालयाकडून जन आरोग्य योजना जाहीर यापूर्वीच करण्यात आली आहे. या योजनेसाठी लाभार्थी म्हणून निवड झालेल्या नागरिकांना पत्राद्वारे कळविण्यात देखील आले आहे. मात्र, अनेक नागरिकांनी ही नावनोंदणी केलेली नाही. ही नावनोंदणी आम्ही मोफत करत आहोत."
प्रियांका महेश शेळके
अध्यक्षा, उमा महेश महिला प्रतिष्ठान,
धनगरवाडी, ता. जुन्नर
140821\picsart_08-14-07.14.34.jpg
कॅप्शन : शिवगर्जना युवा प्रतिष्ठानच्यावतीने जन आरोग्य योजनेसाठी नावनोंदणीचा उपक्रम हाती घेतला आहे.हिवरे तर्फे नारायणगाव येथे मार्गदर्शन करताना प्रियांका शेळके.