पुणे : दिवाळीच्या काळात जर पर्यटनासाठी बाहेर जाणार असाल तर आताच रेल्वेचे आरक्षित तिकीट काढून ठेवा. कारण पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या अनेक गाड्यांना रिग्रेट सुरू झाले आहे, तर अनेक गाड्यांना वेटिंग सुरू झाले आहे. पुणे - मुंबईवगळता उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्यांना वेटिंगसह रिग्रेट सुरू आहे. यात प्रामुख्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी आताच तिकीट बुक करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जवळपास ८० टक्के प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित २० टक्के गाड्या ह्या राज्य सरकारच्या परवानगीनंतर सुरू होतील. आता दिवाळीचा हंगाम सुरू होत आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात प्रवासी आपले घर गाठण्यासाठी अथवा पर्यटनासाठी बाहेरच्या शहरांना जातात. पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या बहुतांश गाड्या ह्या दुसऱ्या राज्यातील शहरास जोडले आहे. त्यामुळे काही विशिष्ठ गाड्यांना नेहमीच गर्दी असते. दिवाळीच्या काळात तर ह्या गाड्यांमध्ये पायदेखील ठेवण्यास जागा नसते. तेव्हा अशा स्थितीत प्रवास करणे म्हणजे नाहक त्रास सहन करणे होय. तेव्हा कुठल्या मार्गावरच्या गाड्यांना गर्दी आहे. कोणत्या गाडीत आरक्षण उपलब्ध आहे याचा विचार करून आपल्या प्रवासाचा बेत आखणे गरजेचे ठरेल.
या गाड्यांना आहे रिग्रेट -
पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या पुणे - दानापूर, कोल्हापूर - गोंदिया एक्स्प्रेस, पुणे - जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, पुणे -बिलासपूर, गोवा एक्स्प्रेस, पुणे- हावडा एक्स्प्रेस, पुणे - दरभंगा, पुणे - गोरखपूर आदी विविध गाड्यांना दिवाळीच्या काळात रिग्रेट सुरू आहे. यातील काही गाड्यांना दिवाळी संपल्यानंतरही जवळपास १० ते १५ दिवस रिग्रेटची स्थिती आहे.
या गाड्यांना वेटिंग-
पुणे - गोरखपूर, पुणे - जयपूर , पुणे -हेदराबाद, पुणे - दिल्ली, पुणे - वेरावळ, पुणे - राजकोट एक्स्प्रेस, पुणे - भुवनेश्वर एक्स्प्रेस, पुणे - अहमदाबाद एक्स्प्रेस, पुणे - लखनऊ एक्स्प्रेस, पुणे - हबीबगंज, पुणे- नागपूर एक्स्प्रेस आदी गाड्यांना वेटिंग सुरू आहे. पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना फार वेटिंग नाही.