पुणे : महिन्यातून एकदा होणाऱ्या लोकशाही दिनाला महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गैरहजर असल्याने सोमवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. लोकशाही दिनावर बहिष्कार टाकून त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रशासनाला अखेर पोलिसांची कुमक मागवावी लागली. आयुक्त पालिकेत आल्यानंतर त्यांनी लोकशाही दिनाचा कार्यक्रम घेतला.महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेमध्ये लोकशाही दिन घेतला जातो. नागरिकांच्या समस्यांना कुठेच काही दाद न मिळाल्यास अखेर पर्याय म्हणून लोकशाही दिनामध्ये थेट आयुक्तांकडे नागरिकांना त्यांचे गाऱ्हाणे मांडता येते. मात्र या लोकशाही दिनाला कुणाल कुमार अनेकदा उपस्थित राहू शकले नाहीत. जानेवारी महिन्यातील लोकशाही दिनासाठीही ते हजर नसल्याचे पाहून नागरिकांच्या भावना अनावर झाल्या. आयुक्तांकडील लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्यासाठी नागरिकांना अनेक टप्पे पार पाडून यावे लागते. अनेकदा हेतुपुरस्सर अधिकाऱ्यांकडून काम केले जात नाही, त्याची तक्रार आयुक्तांकडे केल्यास त्यावर काहीतरी कार्यवाही होऊ शकेल अशी नागरिकांची अपेक्षा असते. मात्र ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आहेत, ज्यांनी काम केले नसल्यामुळे नागरिकांना आयुक्तांकडे यावे लागले तेच अधिकारी सोमवारी आयुक्तांकडील लोकशाही दिनामध्ये तक्रार घेण्यासाठी बसले होते. त्यामुळे नागरिकांनी या लोकशाही दिनामध्ये सहभागी न होता, आयुक्त आल्यानंतरच लोकशाही दिनाचा कार्यक्रम घ्यावा अशी भूमिका घेतली. त्यानुसार त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आयुक्त महत्त्वाच्या मीटिंगनिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त आल्याशिवाय लोकशाही दिनामध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेतची बैठक संपवून दुपारी दोनच्या सुमारास कुणाल कुमार महापालिकेत आले. त्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. बांधकाम विभागाविषयीच्या सर्वाधिक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्याचबरोबर शाळेतील अतिक्रमण काढले जात नाही, रस्त्याचे काम झाले नाही, शाळेतून जीना चोरीला गेला आहे आदी तक्रारी नागरिकांनी मांडल्या. कुणाल कुमार यांनी त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आंदोलनकर्त्यांनी शेवटी त्यांचे आभार मानले.
लोकशाही दिनामध्ये आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे संताप
By admin | Published: January 05, 2016 2:37 AM