पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष बी. ए, बी काॅम, एम.ए, एम. काॅम आणि एम. बी. ए हे अभ्यासक्रम चालविण्यात येत हाेते. आता हे अभ्यासक्रम दूरस्थः शिक्षण पद्धतीवर सुरु करण्यात येणार आहेत. त्याद्वारे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन आणि अध्ययनाचे साहित्य पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारे शक्य हाेणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पूर्वीच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी पदवीसाठीचे द्वितीय व तृतीय वर्षाचे व पदव्युत्तरांसाठी द्वितीय वर्षाचे प्रवेश हे बहि:स्थ म्हणूनच देण्यात येणार आहेत.
दूरस्थ: शिक्षणपद्धती ही अधिक कालसुसंगत आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच, ती राबविल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात ‘यूजीसी’ची गुणवत्ता सुधारणेबाबतची मार्गदर्शक तत्वे अधिक चांगल्याप्रकारे राबवता येणार आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे अतिरिक्त संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.
दूरस्थ: पद्धतीमध्ये पुढील बाबींचा समावेश असणार आहे.
· दूरस्थ: पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विविध केंद्रांवर त्या त्या विषयाचे मार्गदर्शन व अध्ययनासाठीचे आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे विषयाचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास व्हावा, यासाठी वेळोवेळी 'असाईनमेंट' करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा बहि:स्थ शिक्षण पद्धतीत उपलब्ध नव्हती.
· विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेमार्फत पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार अभ्यासकेंद्रे उपलब्ध करून देण्यात येतील.
· हे अभ्यासक्रम इतर नियमित अभ्यासक्रमाप्रमाणेच राहतील व सत्र ऐवजी वार्षिक परीक्षा पद्धत श्रेयांकांनुसार मूल्यमापन पध्दत राबविण्यात येईल.
· दूरशिक्षण अभ्यासक्रमाबाबत प्रवेश,मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी मदत, सूचना, आदी. सुविधांसाठीचे स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले जात आहे. तसेच, येत्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दूरशिक्षण अभ्याक्रमाचे प्रवेश सुरू करण्यात येतील.
· दूरशिक्षण विभागामार्फत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यासकेंद्रावर प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग विद्यापीठातर्फे चालविले जाणार आहेत. या वर्गांचे वेळापत्रक प्रवेश प्रक्रियेनंतर जाहीर करण्यात येईल.
. दूरशिक्षण व्यवस्थेद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य व उत्तम दर्जाच्या मार्गदर्शनाद्वारे पदवी व पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्याचा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार आहे.