पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आपल्या हद्दीतील तब्बल ८६ हजार अनधिकृत बांधकामांची यादी तयार केली असून, यापैकी तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांना नोटिसादेखील दिल्या आहेत. अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचे शासनाचेच धोरण आहे. त्यामुळे पीएमआरडीएनेदेखील आपल्या हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करावीत, अशी लेखी मागणी खासदार संजय काकडे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त महेश झगडे यांना लेखी निवदेन देऊन केली आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आपल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली असून, याचाच एक भाग म्हणून हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील तब्बल ९ हजार ३१ अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेच्या आधारीदेखील या अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात येत आहेत. या सर्व अनधिकृत बांधकामांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील (एमआरटीपी) कायद्यातील तरतुदीनुसार पीएमआरडीएकडून कारवाई करण्यात येत आहे. पीएमआरडीच्या वतीने आतापर्यंत तीन अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात आली असून, दहा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकामांमध्ये सर्वाधिक बांधकामे हवेली तालुक्यातील आहेत. नोटिसांमुळे येथील बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले असून, तब्बल तीन लाख रहिवासी बेघर होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन काकडे यांनी सोमवारी महेश झगडे यांची भेट घेऊन पीएमआरडीएच्या हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी केली आहे.याबाबत काकडे यांनी आपल्या निवदेनामध्ये म्हटले, की शासनाने २०१२ पर्यंतच्या अनधिकृत झोपडपट्ट्या कायम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुणे महापालिकेनेसुद्धा गुंठेवारी अंतर्गत बांधकामांना अधिकृत दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री यांनी स्वत: पिंपरी-चिंचवड येथील अनधिकृत बांधकामे नियमित करून नागरिकांना दिलासा दिला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पीएमआरडीएनेदेखील आपल्या हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करावी, अशी मागणी झगडे यांच्याकडे केली आहे.(प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामे नियमित करा
By admin | Published: November 08, 2016 1:55 AM