कामगार पुतळा वसाहतीत जवळपास ७० वर्षांपासून ४५०० नागरिक राहत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही पुनर्वसनासाठी लढा देत आहोत. आमच्या मुलांचे शिक्षण, लोकांची नोकरी शिवाजीनगर भागातच चालू आहे. त्यामुळे पुनर्वसन येथून २ किलोमीटरच्या आत शिवाजीनगरलाच करावं. अशी मागणी कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांनी केली आहे..
कामगार पुतळा झोपडपट्टी बचाव समिती, पुणे शहर,व पुणे शहरातील विविध सतरा दलित संघटनेच्या वतीने कामगार पुतळा चौक याठिकाणी समितीच्या अध्यक्षा बायडाबाई पवार, उपाध्यक्षा सखुबाई डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मागणी केली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश म्हणून पुणे महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे महामेट्रो प्रकल्पाचे उभारणीसाठी पुनर्वसनाचा निर्णय घेतला होता. पण येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांचे परस्पर पुनर्वसन विमान नगर व हडपसर या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पात करण्यात आले. त्याविरोधात आंदोलन करत दलित संघटनांनी आवाज उठवला आहे. यावेळी समितीच्या अध्यक्षा म्हणाल्या बायडाबाई पवार म्हणाल्या की, आमची पिढीही गेल्या सत्तर वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. महापालिकेला मेट्रो प्रकल्पासाठी पुनर्वसन करायचं आहे. या गोष्टीला आमचा अजिबात विरोध नाही. पण ते शिवाजीनगर भागात दोन किलोमीटरच्या अंतरात असावे. येथील नागरिकांना कुठल्याच बाबतीत अडचणी येणार नाहीत. येथील बहुसंख्य लोक कामगार असून मुलांचे शिक्षण देखील येथे सुरू आहे, शिवाजीनगर परिसरात अनेक शासकीय जमिनी असून त्याबद्दल सर्व माहिती व त्या जमिनीची कागदपत्रे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवली सुद्धा आहे.
याबाबत हमीद शेख म्हणाले, आमच्या व्यथा आम्ही ३१मार्चला महामेट्रो व्यवस्थापक ब्रिजेश दिक्षित यांना देखील मुंबई जाऊन सांगितल्या होत्या. त्यावर त्यांनी पालकमंत्री अजितदादा यांनी जर असा आदेश काढला आहे. तर आमची काहीच हरकत नाही, तेव्हा पुनर्वसनाचा खर्च पुणे महामेट्रो व पीएमआरडीए करायला तयार आहे. असे सांगण्यात आले.