पुणे : गेल्या अनेक वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली जळमटे लागलेली कागदपत्रे, जीर्ण झालेले दाखले अशा दहा हजारांहून अधिक फाईलवरील जळमटे दूर करण्याचे काम पुण्यातील पुनर्वसन शाखेने हाती घेतले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व कर्मचारी फाईल्सचे वर्गीकरण करण्याच्या कामामध्ये व्यस्त असून, लवकरच रेकॉर्ड रूमचा कायापालाट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा पुनर्वसन खात्यातील अभिलेखांची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. धरणग्रस्तांचे दाखले देण्यापासून पर्यायी जमीन वाटपापर्यंतचे अनेक अभिलेख जीर्ण झाले आहेत. काही कागदपत्रांचा ताळमेळ लागणेही मुश्कील झाले होते. काही धरणांची उभारणी होऊन तीस-चाळीस वर्षे उलटली आहेत. परंतु त्यातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यांची कागदपत्रे हाताळून खराब झाली आहेत. या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे २५ हून अधिक लहान-मोठे प्रकल्प अस्तित्वात आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील लाखो लोक बाधित झाले आहेत. आजही हजारो कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मिटलेला नाही, तर अनेक प्रकल्पांत केवळ कागदपत्रे मिळत नसल्याने हजारो बोगस लाभार्थ्यांना लाभ झाला आहे. परंतु आता पुनर्वसन शाखेच्यावतीने रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले असून, यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.