पुणे : शहरात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात मागील वर्षी सर्वाधिक नुकसान झालेल्या आणि अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करणाऱ्या ‘टांगेवाला कॉलनी’मधील रहिवाशांचे नव्या जागेत पुनर्वसन केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील अरण्येश्वर येथील जागेवर हे पुनर्वसन होणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी दिली.
पुणे महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी झालेल्या समन्वय आढावा बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह प्राधिकरणाचे सीईओ राजेंद्र निंबाळकर यांच्यासह दोन्ही यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
अरण्येश्वर येथील टांगेवाला कॉलनी ही आंबिल ओढ्याच्या अगदी काठावर वसलेली आहे. येथील रहिवाशांचे अनेक वर्षांपासून पुनर्वसन रखडलेले आहे. गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामध्ये या वसाहतीचे सर्वाधिक नुकसान झाले होते. तसेच, याठिकाणी झालेल्या घरपडीमुळे सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या रहिवाशांचे जवळच्याच अॅमेनिटीच्या जागेत पुनर्वसन करुन त्याचे आरक्षण बदलण्याबाबत यापुर्वी आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्तरावर चर्चा झाल्या होत्या. परंतु, हा विषय पुढे सरकू शकला नव्हता. रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक आहेत. दर, पावसाळ्यात येथील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागते.
परंतु, नव्याने झालेल्या चर्चेनुसार, अरण्येश्वरमध्येच जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील एक भूखंड आहे. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यास या जागेवर रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हे पूर्ण बांधकाम गोयल-गंगा या बांधकाम कंपनीकडून करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी आवश्यक असल्याचेही अगरवाल यांनी स्पष्ट केले.