भोर : भोर शहरातील चौपाटी येथील दहीहंडी मंडळाचे गणपती व श्रीकृष्णाचे चित्र असलेले पोस्टर पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांनी फाडल्याने शहरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या. चौपाटी येथील मंडळाने भोर पोलीस ठाण्याला निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र ही मागणी फेटाळल्याने सुमारे ३ हजार तरुणांनी भोर पोलीस ठाण्यासमोर ४ तास रास्ता रोको आंदोलन केले. भोर शहर बंद ठेवण्यात आले होते. याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी वादग्रस्त पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांची अखेर उचलबांगडी केली.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक भोर पोलीस ठाण्याला आले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तरुणांनी रास्ता रोको आंदोलन थांबविले. या निर्णयाचा फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. पोलीस निरीक्षक खोत यांनी रात्रीची गस्त घालत असताना चौपाटी येथील दहीहंडी मंडळाचे पोस्टर फाडले. या पोस्टरवर गणपती व श्रीकृष्णाचेही फोटो होते. या प्रकाराने सर्व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तरुणांनी केली. त्यावर गुन्हा दाखल होणार नाही आणि दहा वेळा पोस्टर फाडेन, असा दम दिला. त्यामुळे तरुण चिडले. दुपारी २ वाजता त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे एसटी बस खासगी वाहतुकीची सुमारे ४ तास कोंडी झाली. शेवटी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी तहसीलदार वर्षा शिंगण, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते व शहरातील तरुण गोपाळ व गणेशभक्त व कार्यकर्ते उपस्थित होते. खोत यांची चौकशी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाºयांची नेमणूक केली जाईल. खोत यांची बदली करून नवीन अधिकाºयांची नेमणूक करण्याचे आश्वासन या वेळी पोलीस अधीक्षक हक यांनी दिले.>अनेकांच्या तक्रारी...श्रीकांत खोत यांनी मंडळाचे कार्यकर्ते, जीपवाले, शाळांच्या गाड्या, दुकानदार, दुचाकी-चारचाकीचालक यांच्यासह फिर्यादी अशा सर्वांनाच त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी वेळोवेळी पुढे आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याविरोधातील वातावरण अगोदरपासूनच तयार होते. त्यातच आज पोस्टर फाडल्याने भक्ताच्या भावना दुखावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वादग्रस्त श्रीकांत खोत यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:04 AM