पुणे : रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारींची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा वाढली आहे. बाहेरगावाहून रात्री उशिरा येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक करून जास्तीचे भाडे मागणे, जवळच्या ठिकाणी येण्यास नकार देणे अशा प्रकारांमुळे प्रवासी हवालदिल झाले आहेत.प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व वाहतूक पोलिसांच्या वतीने भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडल्यानंतर रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारी कमी झाल्या होत्या. तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी साध्या वेशातील महिला पोलीस पाठवून भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली होती. मात्र पुन्हा भाडे नाकारण्याचे प्रकार वाढले आहेत.सकाळच्या वेळी किंवा रिक्षांची उपलब्धता कमी असताना रिक्षाचालकांकडून हमखास अडवणूक केली जाते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना तर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बाहेरगावच्या लोकांकडून जास्तीचे भाडे मागून त्यांची अडवणूक केली जाते अशी तक्रार अनिकेत राठी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे केली आहे. रिक्षा संघटनांनीही यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राठी यांनी केली आहे. रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून दमदाटीची भाषा वापरली जाते असे अनंत ढगे यांनी सांगितले. शिवाजीनगर, स्वारगेट, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी रिक्षाचालक घोळक्याने थांबलेले असतात, वाटेल तेवढे भाडे त्यांच्याकडून मागितले जाते. रात्रीच्या वेळेस अडवणुकीचे प्रकार जास्त होतात. यावर मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी प्रिपेड केंद्र सुरू करण्यात आले होते; मात्र रेल्वे स्टेशन वगळता इतर ठिकाणचे प्रिपेड केंद्र बंद पडलेले आहे. टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध हवाआरटीओच्या १८००२३००१२ या टोल फ्री क्रमांकावर रिक्षाचालकांबाबत तक्रारी करता येतात. मात्र हा टोल फ्री क्रमांक केवळ कार्यालयीन वेळेतच सुरू असतो. त्यामुळे कार्यालयीन वेळे- व्यतिरिक्त अडचण आल्यास तक्रार नोंदविता येत नाही. त्यामुळे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध असावा, अशी मागणी नीलेश महाजन यांनी केली आहे.ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावीरिक्षाचालकांनी भाडे नाकारले, गैरवर्तन केले तर mh12@mahatranscom.in या ई-मेल आयडीवर तक्रार करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे. ई-मेल मध्ये रिक्षाचा क्रमांक, घटना घडली ती तारीख, वेळ, ठिकाण व्यवस्थित नमूद करावी. ई-मेलवर लेखी तक्रार आल्यास कारवाई करणे अधिक सोयीस्कर ठरते असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांशी चर्चा करून याविरुद्ध आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या वतीने संयुक्त मोहीम उघडली जाईल, असे त्यांनी सांगितले.
रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे सुरूच
By admin | Published: March 28, 2016 3:26 AM