पुणे : विवाहितेने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने मान, डोक्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.
विश्वास बापू काळेकर (वय ४२, रा. कर्वेनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. शुभांगी प्रकाश खटावकर यांचा खून केल्याप्रकरणी पतीने अलंकार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. ही घटना १८ आँक्टोबर २०१६ रोजी कोथरूड भागात घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. शुभांगी यांनी काळेकर याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
तसेच, त्यापूर्वी आरोपीला कर्वेनगर चौकी येथे घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे अपमान झाल्याची त्याची भावना होती. घटनेच्या दिवशी त्या कामावर चालत्या होत्या. त्यावेळी त्याने त्यांना आडवून कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. त्यांची अँक्टीव्हा गाडी आणि मोबाइल घेऊन तो पसार झाला होता. मोबाइल फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील जावेद खान यांनी केली.