लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्पकतेने, विचारपूर्वक देशातील प्रत्येक क्षेत्राचा कायाकल्प करत आहेत. सहकार, शेती अशा सर्वांचा त्यात समावेश आहे. युवकांनी नव्या जगाचे प्रशिक्षण घेत या बदलात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा आणि देशाला सामर्थ्यसंपन्न करावे असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानातील वसतीगृहाचे उद्घाटन रूपाला यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २०) आभासी पद्धतीने झाले. संस्थेचे देशभरातील आजीमाजी विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर यात ऑनलाईन सहभागी झाले होते.
रूपाला म्हणाले की, देशाच्या जडणघडणीत ‘वैकुंठ मेहता’सारख्या संस्थांचा मोठा सहभाग असतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवा विचार, नवे प्रयोग राबवत आहे, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. या संस्था ती गरज भागवू शकतात.
संस्थेचे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी यांनी रूपाला यांनी स्वागत केले. संस्थेला वसतीगृहाची गरज होती. त्यामुळे आधुनिक सुविधांनी सज्ज ५० खोल्यांचे हे वसतीगृह संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे त्रिपाठी म्हणाले. डॉ. डी. रवी यांनी संयोजन केले.