नारायणगाव : पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका हा कोरोना रुग्णाचा हॉटस्पॉट ठरत असतानाच तालुक्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी वणवण फिरण्याची वेळ तर दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन सिलेंडर मिळत नसल्याने कोरोना सेवा देणारे डॉक्टर हतबल झाले आहेत. रेमडेसिविर व ऑक्सिजन सिलेंडर मुबलक प्रमाणात नसल्याने जुन्नर तालुक्यातील वैद्यकीय सेवा व्हेंटिलेटर वर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी मंत्री आहेत तिथे रेमडेसिविर व ऑक्सिजन सिलेंडरचे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र जुन्नर तालुक्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि आमदार असताना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
जुन्नर तालुक्यात एकूण २१ कोविड केअर सेंटर आहेत. त्यामध्ये लेण्याद्री, ओझर येथील कोविड सेंटर, नारायणगाव ग्रामीण रुग्णालय ही शासकीय व इतर १८ खासगी कोविड केअर सेंटर आहेत. यामध्ये एकूण १ हजार १५ बेडची संख्या असून त्यामध्ये साधे बेड ६७८, आयसीयू बेड ४६ , ऑक्सिजन बेड २६८ व व्हेंटिलेटर १५ आहेत. काही दिवसापासून जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. ज्यांची ऑक्सिजन लेव्हल ९० पेक्षा कमी व एचआरसीटी ५ पेक्षा जास्त असेल अशा रुग्णांना परिस्थितीनुसार रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते.
१४ एप्रिल अखेर एकूण रुग्णांची संख्या ९ हजार १२२ आहे . त्यापैकी उपचारानंतर ७ हजार ६२४ रुग्ण बरे झाले तर २८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . सध्या १ हजार २१५ रुग्ण अक्टीव्ह आहेत. नारायणगाव, वारूळवाडी, जुन्नर ,बेल्हे, ओतूर, राजुरी, आर्वी, आळे, पिंपळवंडी, येणेरे, पारगाव, निमगाव सावा ही गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. यापूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शन होलसेल मेडिकल दुकानातून मिळत होते. मात्र विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने कोरोना हॉस्पिटलमध्ये थेट रेमडेसिविर मिळणार आहे. पूर्व तयारी न करताच हा निर्णय झाल्याने रेमडेसिविर कसे मिळणार याचा गोंधळ वाढला आहे. तालुक्याला रोज ५०० ते ६०० रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता असताना पुरवठा कंपनीकडून केवळ २०० ते ३०० इंजेक्शन उपलब्ध होत आहे . त्यात प्रत्येकाला रुग्णाला रेमडेसिविर मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच ऑक्सिजन सिलेंडर कमी प्रमाणात मिळत असल्याने हॉस्पिटल चालकांपुढे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
--
कोट १
तालुक्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी ६०० च्या पुढे असताना कंपनीकडून केवळ १०० च्या आसपास इंजेक्शन उपलब्ध होत आहे.
कौशल वऱ्हाडी, रेमडेसिविर इंजेक्शनचा, पुरवठादार
--
कोट २
१४ एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यात २१ हजारपेक्षा जास्त इंजेक्शनची आवश्यकता होती. प्रत्यक्षात ३ ते ४ हजार इंजेक्शन आले आहेत. जुन्नर तालुक्यात रेमडेसिविरचा पुरवठा जास्त मिळावा यासाठी पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.
- डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके
कोट ३
प्रांत, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, औषध वितरक व कोविड सेंटर यांच्या सुसूत्रता दिसत नाही. तालुक्यात सर्वाधिक कोविड रुग्ण असताना केवळ ९० रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले व आंबेगाव तालुक्यात ६ कोविड सेंटर व रुग्ण कमी आहेत तिकडे २५० इंजेक्शन देण्यात आले. हा गलथान कारभार तातडीने दुरूस्त व्हावा. शासनाकडून केवळ हेल्पलाईन नंबर पाठवून जनतेची दिशाभूल होत आहे.
- शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख, शिवसेना