सुषमा नेहरकर - शिंदे
पुणे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ७२पेक्षा अधिक कुटुंबातील आई-वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने शेकडो पाल्य अनाथ झाले आहेत. परंतु अशा मयत आई-वडिलांची प्रत्येकी ५० हजार अशी एक लाखांची मदत मामा, मावशी, काका व जवळच्या नातवाइकांनीच परस्पर ऑनलाइन अर्ज करून लाटले असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १८ हजार कोरोनामुळे मयत व्यक्तींना ५० हजारांचे वाटप करण्यात आले आहे. याबाबत काही तक्रारी झाल्यानंतर महिला व बालकल्याण विभागाला जाग आली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे तब्बल १९ हजार ३९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे निश्चित झाले. यासाठी शासनाने स्वतंत्र ॲप विकसित करून ऑनलाइन अर्ज मागवले. यासाठी आतापर्यंत तब्बल २७ हजारपेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या १८ हजार व्यक्तींच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. यात आतापर्यंत सात हजार ५०० अर्ज नामंजूर करण्यात आले असून, या सर्व अर्जांवर सुनावणी घेऊन पैसे वाटप करण्यात येणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाला उशिरा जाग
मुला-मुलींचे आई-वडील दोघांचा मृत्यू झाला अशा कुटुंबात एक लाखांची मदत संबंधित पाल्यांच्या नावावर जमा होणे अपेक्षित होते. परंतु यामध्ये मयत आई-वडिलांच्या पाल्यांचे मामा, मावशी, काका अशा नातवाइकांनीच ही मदत लाटल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. गेले काही दिवसांपासून या विषयावर काम करणाऱ्या महिला व बालकल्याण विभागाला उशिरा जाग आली असून, १८ हजार लोकांना वाटप झाल्यानंतर मयत आई-वडिलांची मदत कुणाच्या नावावर जमा झाली यांची माहिती मागवली आहे.