पुणे : कोरोनामुळे दिवसेंदिवस माणुसकी हरवत चालल्याची जाणीव करून देणाऱ्या अनेक घटना आजूबाजूला पाहायला मिळत आहे. कुठे उपचाराला कुणी वाली मिळत नाही तर कुठे मृत्यूनंतरही देहाची हेळसांड थांबलेली दिसत नाही. अशा भेदरलेल्या काळात रक्ताच्या नात्यांनी सुद्धा महत्वाच्या वेळी साथ सोडल्याचे देखील घडले. पण याच कालावधीत समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या घटना देखील प्रकर्षाने समोर येत आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे सुद्धा अशीच एक घटना घडली. आपल्या ८२ वर्षांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यावर नातेवाईकांनी कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली.कुणीही कर्ता पुरुष कुटुंबात नसल्याने अंत्यसंस्कार कसा करणार ह्याची सर्वत्र कुजबुज सुरु झाली. शेवटी या कठीणप्रसंगी घरातील महिलांनी मोठ्या धीरोदात्तपणाचे दर्शन घडवत वडील, सासऱ्यांवर अंत्यसंस्कार करत समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला.
नामदेव सखाराम खेडकर असे त्या ज्येष्ठ मृत व्यक्तीचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मंगळवारी ( दि.८ ) स्थानिक रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोनाच्या संशयामुळे आकस्मिक निधन होऊनही अंत्यसंस्कारासाठी कोणीही मदतीला येईना त्यामुळे जवळपास १० तास मृतदेह दवाखान्यात पडून होता. शेवटी नातीनं आपले मन घट्ट केले आणि आपल्या आजोबांवर अंत्यसंस्कार करायचेच असे मनाशी ठरवून तिने गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या कानावर हा गंभीर विषय घातला. तसेच याबाबत स्वतः किरण पिंगळे या नातीने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना फोन करून हा विषय सांगितला. राऊत यांनी माहिती जाणून घेतली आणि पोलीस खात्यातील माणुसकीचे दर्शन घडविले.राऊत यांनी संबंधित डॉक्टराना संपर्क करून या मृत्यू पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कोरोना चाचणी करून त्वरीत अहवाल मागितला.डॉक्टरानी रॅपिड चाचणी केली तर ती निगेटिव्ह आल्याने पोलीस कर्मचारी या कुटुंबाच्या मदतीला पाठवले. आता अंत्यसंस्कार करायचा पण कुठे असा प्रश्न पडला होता.
नातेवाईक तर दुरूनच अंत्यसंस्कार घरी न करण्याचा सल्ला देत होते शेवटी घरातील सुना, मुली आणि नात किरण पिंगळे यांच्या मदतीला शिवाजी खेडकर तसेच पोलीस कर्मचारी धावून आले. त्या सर्वांनी पुढाकार घेऊन हृदय विकाराने मृत्यू पावलेल्या या जेष्ठ नागरिकावर अंत्यसंस्कार केले. लेकींनी आपल्या वडिलांवर व सुनांनी आपल्या सासऱ्यावर नातीच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार केल्याने समाजामध्ये एक जाणीव करून देणारा नवा पायंडा पडला आहे.
.............................
कोरोनाच्या धास्तीने जवळची नातीही दुरावत चालल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या नुसत्या संशयामुळे आणि अफवांवर विश्वास ठेवून एखाद्या घरातील व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला तरी कोणीही मदतीला धावून येत नाहीत हे या दुर्दैवी प्रसंगावरून लक्षात येते आहे. अशा प्रसंगात संबंधित कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.आम्हाला ही तो त्रास चुकला नाही. पण या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे सहकार्य लाभले. परंतू,समाज काय म्हणेल याचा विचार न करता महिलांनी अशाप्रसंगी खंबीर होऊन धैर्याने तोंड द्यावे, असे किरण पिंगळे यांनी ''लोकमत'' शी बोलताना सांगितले.