पुणे: मुळशीतील SVS अक्वा कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मालकाच्या हलगर्जीपणामुळे कष्टकरी कामगारांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत त्या कामगारांचे कुटुंब निराधार झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल अजून काही पाऊल उचलले नाही. त्याबरोबरच आणखी मागण्याही पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा इशारा मृतांचे नातेवाईक आणि मुळशी भागातील संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये १५ स्त्रिया आणि 3 पुरुषांचा समावेश होता. तेव्हा कंपनीचे मालक निकुंज शहा व गौरव शहा यांच्याकडे सुरक्षेसाठी लागणारे कोणतेही साधन नव्हते. त्यांचा हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला आहे.
सोमवारच्या दुर्घटनेनंतर प्रवीण तरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनीला मुळशी पॅटर्न दाखवण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांनीही डीएनए आणि ब्लड सॅम्पलचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. संबंधित शासकीय यंत्रणेला त्यांच्या जबाबदारीबाबत खुलासा मागितला आहे. असे नातेवाईकांनी यावेळी सांगितले.
नातेवाईकांच्या प्रमूख मागण्या
- प्रत्येक मृत कुटुंबातील वारसांना २५ लाख रुपये द्यावेत - मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी - प्रत्येक मृत व्यक्तीच्या घरातील एकाला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. - जबाबदारी आणि कर्तव्यात कुचराई करणारी एमआयडीसी तसेच प्रदूषण मंडळ सारख्या शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आरोपी करावे.