पुणे - राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तरुणांच्या आग्रहास्तव विरंगुळा म्हणुन तालुका दौरा करत असताना वेळ काढुन सूर-फाट्या खेळण्याचा व पतंग उडिवण्याचा आनंद घेतला. सोलापूरमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री म्हणून व राज्यमंत्री असल्याने भरणे आपल्या कामात नेहमी व्यस्त असतात. पण, व्यस्त कामातून इंदापूर वरून भरणेवाडीला जात असता निमगाव केतकी याठिकाणी युवकांना पाहून स्वत:ही सूर-फाट्या खेळात ते रमल्याचे पाहायला मिळाले.
नागपंचमी सणानिमित्त काही युवक रस्त्यालगत असणार्या मोकळ्या मैदानात सुरफाटा खेळत असताना भरणे यांना दिसले. त्यावेळी भरणे मामांनी आपली गाडी थांबवून कोरोनाच्या टेन्शनमधून रिलॅक्स होत थोडसं खेळण्याचा आनंद घेतला. आपल्या व्यस्त वेळेतून त्यांनी खेळलेला रांगडा पारंपारिक खेळ, हा जिवनशैलीत स्नायुंच्या मजबुतीसाठी महत्वाचा असल्याचेही भरणे यांनी अधोरेखीत केले. त्यानंतर, येथील युवकांना कोरोनासंदर्भात काळजी घ्या, काळजी करू नका असा सल्लाही त्यांनी दिला. इंदापूरच्या मामा भरणेंचा हा व्हिडीओ तालुक्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, बाभुळगाव येथे महिला भगिनींना नागपंचमी निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप करण्यात आले, त्यावेळी तरूणांच्या आग्रहास्तव भरणे यांनी पतंग उडवण्याचा आनंदही घेतला.