लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक कणखरता ही महत्त्वाची असते. मानसिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एटेनएक्स स्पोर्ट्सने येत्या २६ जानेवारीला पुणे ते महाबळेश्वर रिलेचे आयोजन केले आहे.
एटेनएक्स स्पोर्ट्सचे संस्थापक संचालक आदित्य गणेशवाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ए टेन स्पोर्ट्सचे करण अंतुरकर, ट्रायअॅथलिट वर्धन बोरगावे, साकेत गणेशवाडे, तेज खाडिलकर, शंकर राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
वर्धन बोरगावे म्हणाले की, पहाटे ४ वाजता वारजे भागातून या रिलेला सुरुवात होणार आहे. यात माझ्यासह साकेत गणेशवाडे, आदित्य गणेशवाडे, तेज खाडिलकर, करण अंतुरकर, राज जोशी, डॉ. चिन्मय चोपडे, शंकर राऊत, प्रतीक आकडकर हे धावपटू पुणे ते महाबळेश्वर हे सुमारे १२६ किमी अंतर धावणार आहेत.
करण अंतुरकर म्हणाले की, कोणताही मैदानी खेळ आपल्या क्षमता वाढविण्यासाठी मदत करतो. मैदानी खेळांमुळे शारीरिक आणि मानसिक कणखरता निर्माण होते. याचा फायदा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने किमान एका मैदानी खेळात सहभागी होणे आवश्यक आहे.