लोकमत न्यूज नेटवर्कवडापुरी : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी. त्याचबरोबर नीरा नदीत धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांच्यासमवेत वडापुरी अवसरी सुरवड येथील शिष्टमंडळ होते. मागण्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, हनुमंत जगताप, महादेव तावरे, केशव सुर्वे, दादा जगताप, सुखदेव निकम, दत्तात्रय सवासे, ज्ञानदेव फडतरे, राजकुमार बर्गे, लक्ष्मण सरडेसह शेतकरी उपस्थित होते. भाटनिमगावचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा २००५ मध्ये बांधण्यात आला. मात्र बंधारा नदीपात्राच्या खोलीपेक्षा १ मीटर खोल आहे. त्यामुळे त्यामध्ये पाणी थांबत नाही. बंधाऱ्याचे ढापे निकृष्ट दर्जाचे आहेत. बंधाऱ्याचे काम ज्या वर्षात पूर्ण झाले तेव्हाच पाणी साठले. त्यानंतर पाणी साठले नाही. बंधाऱ्याचा वापर रहदारीसाठी केला जातो. या बंधाऱ्यांवर तीन पाणीवाटप संस्था अवलंबून आहेत. पाणीच साठत नसल्याने शेतकरी सभासददेखील अडचणीत आले आहेत. त्यामुळे बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या बंधाऱ्याचा बाभूळगाव, भाटनिमगाव, बेडशिंग, अवसरी, वडापुरी, सुरवड अशा आठ गावांना फायदा होणार आहे. या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तरंगवाडी तलावात पाणी सोडल्याबद्दल अधिकाऱ्यांचे आभार मानले. या वेळी वडापुरी, सुरवड, अवसरी या भागातील शेतकरी उपस्थित होते.
नीरा नदीत धरणाचे पाणी सोडा
By admin | Published: May 08, 2017 1:58 AM