Pune Rain: आताच पाणी सोडा, रात्री उशिरा खडकवासल्यातून विसर्ग करू नये; अजित पवारांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:00 PM2024-07-25T16:00:34+5:302024-07-25T16:00:57+5:30
पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफ, लष्करी जवान तैनात असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये
पुणे : पुण्यात काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर वाढत चालला आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मजबूत पाणीसाठा निर्मण झाला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर विसर्गही कमी करण्यात आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन विभागात दाखल झाले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला.
-नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
-पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली असून पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
- पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
- दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात असून आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू आहे. प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
पुरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू
अजित पवारांनी अधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली आहे. त्यांना आताच पाणी सोडण्यास सांगितलं आहे. रात्री उशिरा खडकवासला धरणातून विसर्ग करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच नदीत सोडणारे पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येईल. खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे. ज्या धरणात आणखी पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात, कालव्यात पाणी सोडावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. पुरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
लष्कराचे १०० जवान तैनात
पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर परिसरात बचावकार्य करण्यात आले आहे. लष्कराचे जवान आणि एनडीआरएफचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आहेत. पुर परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तातडीने बचावकार्य केले जाईल त्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. लष्कराचे १०० जवान तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
नैसर्गिक संकटावेळी राजकारण नको
भाजपने पुणे बुडविले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, "नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्यापेक्षा जे नागरिक अडचणीत आहेत, त्यांना बाहेर काढून. पुन्हा पाऊस पडला, तर काय करता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. विरोधक काय बोलतात, याच्याशी काही देणेघेणे त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. दोन्हा महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त यांना खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकजण काम करत आहेत, गैरसमज करण्याचे काहीही कारण नाही. घटना काही काळाकरीता घडलेली आहे, हे मी नाकारत नाही. मात्र त्यातुन लोकांना बाहेर कसे काढता येईल, याचा विचार केला जात आहे.