इंदापूर : येत्या १५ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, असा आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैैठकीत गुरुवारी दिला.
उजनी धरणालगतचे भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने जलचर मृत्युमुखी पडले. नदीकाठच्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील पिकांचा प्रश्न गंभीर झाला होता. याची माध्यमांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली.
आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार हनुमंत डोळस, आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने बुधवारी उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार, अधीक्षक अभियंता चौगुले यांच्यासमवेत जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात उन्हाळी हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. या वेळी निवेदन देण्यात आले. विस्तृत चर्चा झाली. चर्चेनंतर जलसंपदा मंत्री महाजन यांनी वरील आदेश दिले.
इंदापूर तालुक्यातील भीमा नदीवर भाटनिमगाव येथे बांधण्यात आलेल्या बंधाºयाच्या पाण्यावर श्रीभैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्था, अवसरी सहकारी पाणीपुरवठा संस्था, श्रीनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था अशा प्रत्येकी पाचशे ते सहाशे सभासदांच्या उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. सुरवड, गलांडवाडी नं.२, भांडगाव, भाटनिमगाव, बाभुळगाव, अवसरी, बेडशिंगे या इंदापूर तालुक्यातील गावांसह सोलापूर जिल्ह्यातील रांझणी, आलेगाव, रुई या गावांमधील शेतकºयांच्या छोट्या मोठ्या उपसा सिंचन योजना सुरूआहेत.
चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार पाणी मागणी अर्ज करून संस्थांनी पिके घेतली आहेत. मागील काही दिवसांपासून नदीत पाणी नसल्याने या संस्था बंद आहेत. त्यामुळे संस्थेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, अशी वस्तुस्थिती आहे.
भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून असंख्य जलचर मृत्युमुखी पडल्याचे व पिकाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सचित्र वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
फोटो ओळी : उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार यांच्याकडे निवेदन देताना आमदार दत्तात्रय भरणे व इतर.