पुणे : लम्पी आजारामुळे राज्यातील लाखो जनावरे बाधित झाली आहेत. या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही; मात्र आता भारतीय पशुवैद्यकीय संशाेधन संस्थेने (आयव्हीआरआय) लम्पी प्रतिबंधक लस शोधली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मित संस्थेने (आयव्हीबीपी) हे तंत्रज्ञान हस्तांतर करून घेतले आहे. त्यामुळे लवकरच राज्यातच लम्पी प्रतिबंधक लस तयार करण्यात येणार असून, शासकीय संस्थेमार्फत लस तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव आहे. लाखो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. २०१९-२० मध्ये बिहार, झारखंड आदी ठिकाणी लम्पीबाधित जनावरे आढळली. त्यानंतर इतर राज्यातही लम्पीचा प्रादुर्भाव आढळला. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने काही राज्यातील बाधित जनावरांचे नमुने घेऊन लस निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यात यशही मिळाले. काही दिवसांपासून महाराष्ट्रात लम्पी आजाराने थैमान घातले आहे. त्यावर उपाय म्हणून शेळीची देवी लस जनावरांना देण्यात येत होती. मात्र, आता पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मित संस्थेने लम्पी लस तयार करण्याचे तंत्रज्ञान आयव्हीआरआय संस्थेकडून हस्तांतरण करून घेतले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून १ कोटी १८ लाख रुपये देण्यात आले आहे.
आयव्हीबीपी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना लस तयार करण्यासंदर्भात नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच केंद्राकडे नमुना चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. लवकरच त्याला मान्यता मिळणार असून, त्यानंतर लम्पीबाधित जनावरांवर त्याचा वापर करण्यात येईल. साधारण या सर्व प्रक्रियेसाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर उजाडणार आहे.
यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर म्हणाले, देशात कोणत्याही संस्थेने लम्पी प्रतिबंधक लस तयार केलेली नाही. सध्या आयव्हीआरआयने लम्पी लसीचा शोध लावला आहे. राज्यातील लम्पीचा प्रादुर्भाव पाहता, पुण्यातील आयव्हीबीपी संस्थेने लस निर्मितीचे तंत्रज्ञान हस्तगत केले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत लस निर्मितीसाठी केंद्राकडून परवानगी मिळले. त्यानंतर राज्याला आवश्यक असणाऱ्या लसीचे दोन कोटी डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे इतर राज्यांना या लसीचा पुरवठा करता येऊ शकतो. शासकीय संस्थेमार्फत लस निर्मित करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचे डॉ. पंचपोर यांनी सांगितले.