पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सर्वाधिक तापमानाचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी (दि.१६) वरूणराजाने हजेरी लावली. दिवसभराच्या कडक उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना सायंकाळच्या हलक्या सरींनी दिलासा दिला.
राज्यात तापमानाचा पारा अधिकाधिक तापत असून, पुण्यात देखील चांगलाच वर गेला आहे. पुण्यात आज तापमानाचा पारा हा चाळीशी पार गेल्याची नोंद झाली. दोन दिवसांपुर्वी हवामान खात्याने पुण्यात पावसाचा अंदाज दिला होता. रविवारी सायंकाळी थोडासा शिडकावा झाला आणि सोमवारी मात्र पावसाने पुणेकरांना झोडपले. दुपारी प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली आणि विजांचा कडकडाट झाला. जोरदार सरींमुळे पुणेकरांची धावपळ झाली.
कडक ऊन आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाळी वातावरण तयार झाले. येत्या दोन दिवसांमध्ये उन्हाचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रविवारपासून किमान तापमान देखील वाढले आहे आणि कमाल तापमानही चाळीशी पार गेले आहे. आज ४०.७ कमाल तापमान पुण्यात नोंदवले गेले. जे या हंगामातील उच्चांकी आहे. त्यामुळे आज सोमवारी सायंकाळी पुणे जिल्ह्याच्या आकाशात क्यूम्यूलोनिम्बस ढगांची निर्मिती झाली आणि पावसाच्या धारा बरसल्या. ढगांचा गडगडाटही ऐकायला मिळाला. आज पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड येथेही पावसाने हजेरी लावली आहे.