पुणे : गेल्या काही दिवसांपासून झिकाच्या नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. दि. ९ ते १२ ऑगस्टदरम्यान एकाही नव्या रुग्णाची नाेंद झालेली नाही. त्यामुळे झिका रुग्णांची साखळी तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शहरात ७५ रुग्ण असून, नवीन रुग्णवाढ नसल्याने बाब दिलासादायक ठरत आहे.
पुण्यात यावर्षी झिकाचा पहिला रुग्ण हा दि. २० जून राेजी आढळला हाेता. एरंडवणेतील एक ४६ वर्षीय डाॅक्टर आणि त्याच्या १५ वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली हाेती. तेव्हापासून आतापर्यंत शहरातील रुग्णांची संख्या ७५वर पाेहोचली आहे. दि. २० जून ते २० जुलै म्हणजे एक महिन्यात रुग्णसंख्या ही ३२ हाेती. त्यानंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढत जाऊन दाेन महिने पूर्ण हाेण्याच्या आतच दुप्पट झाली. एकेका दिवशी काही वळेला ५ ते ८ पेशंट पाॅझिटिव्ह येत हाेते. त्यापैकी गर्भवती महिलादेखील हाेत्या. मात्र, आता ही संख्या घटत आहे. गेल्या चार दिवसांपासून एकही रुग्ण न आढळल्याने आराेग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
गर्भवतींचे स्कॅनही नाॅर्मल
झिका हा डासांमुळे इतरांना पसरणारा आजार असला तरी ताे गर्भवती महिलांच्या बाळांसाठी हानिकारक ठरताे. आतापर्यंत ७५ पैकी ३२ रुग्ण या गर्भवती महिला आहेत. त्यापैकी बहुतांश जणींचे १८ महिने पूर्ण झाल्याने त्यांनी बाळांमध्ये काही व्यंग निर्माण झाले आहे का? हे पाहण्यासाठी त्यांच्यामध्ये एनटी स्कॅन केले जाते. कारण यामध्ये बाळांना काही गुंतागुंत निर्माण हाेण्याची शक्यता असते. परंतु, ज्या-ज्या महिलांच्या गर्भाचे स्कॅन केले. त्यांच्यामध्ये बाळ नाॅर्मल आढळून आलेले आहे. म्हणून त्याचा फारसा काही परिणाम बाळावर हाेईल असे वाटत नाही. तसेच एनआयव्हीच्या मते हा विषाणू एशियन असल्याने ताे फारसा हानिकारक नाही. असे सध्या दिसत असले तरी प्रत्यक्ष प्रसूती झाल्यावरच त्याचा खरा परिणाम दिसून येईल.
झिका रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. दि. ९ ते १२ ऑगस्टदरम्यान चार दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. थाेडक्यात, रुग्णसंख्या स्कॅटर्ड स्वरूपात आढळून येत आहे. तसेच, आतापर्यंत एकूण ७३६ रक्तनमुने तपासणी करण्यासाठी पाठवले असून, त्यांपैकी ६६५ नमुने हे गर्भवती महिलांचे आहेत. अजून काही नवीन रुग्णसंख्या पाॅझिटिव्ह येण्याची शक्यता असली तरी संख्या मात्र घटत आहे. - डाॅ. सूर्यकांत देवकर, साथराेग अधिकारी, पुणे मनपा