पुणे : डायलेसिस व कॅन्सर या दीर्घकालीन आजाराच्या उपचारासाठी रूग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांना दरवर्षी तीच ती कागदपत्रे सादर करण्याचा त्रास आता वाचणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोन्ही आजारावरील उपचारासाठी शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे घेतलेे कार्ड हे ॲटोरिन्युअल (महापालिका स्तरावरच नुतनीकरण) करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता चंदनशिव यांनी याबाबत माहिती दिली. या आर्थिक वर्षांत म्हणजेच १ एप्रिल, २०२४ पासून ते १७ मे पर्यंत शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या डायलेसिस व कॅन्सरच्या रूग्णांच्या १ हजार ४४ कार्डचे ॲटोरिन्युअल करण्यात आले आहे. तसेच आत्तापर्यंत एकूण कार्डधारकांपैकी डायलेसिस व व कॅन्सर रूग्णांसह इतर लाभार्थ्यांचे ६ हजार २५४ कार्डचे वितरण करण्यात आले आहे.
शहरातील गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. तसेच याशिवाय शहरातील मोठ्या खासगी दवाखान्यांमध्ये उपचाराच्या ५० टक्के खर्च देणाऱ्या, शहरी गरीब सहाय्य योजनेची सुरूवात पुण्यात झाली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपये आहे, अशा कुटुंबातील व्यक्तींना महापालिकेच्या पॅनलवरील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी वर्षाला एका कुटुंबासाठी एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते. प्रारंभी वर्षाला ४ कोटी रूपये तरतूद असलेल्या या योजनेत गेल्या पाच वर्षात तब्बल ३०८ कोटी ६६ लाख ४० हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यापैकी ३०० कोटी २९ लाख ७ हजार रूपये शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय उपचारावर महापालिकेने खर्च केले आहेत.