खेडमध्ये शिवसेनेला मोठा दिलासा!पंचायत समिती सभापतींवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:57 PM2021-06-10T15:57:46+5:302021-06-10T16:07:09+5:30

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या खेड पंचायत समितीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे चांगलेच तापले आहे.

Relief to ShivSena in Khed! Postponement of no confidence motion against Panchayat Samiti Sabhapati post | खेडमध्ये शिवसेनेला मोठा दिलासा!पंचायत समिती सभापतींवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती

खेडमध्ये शिवसेनेला मोठा दिलासा!पंचायत समिती सभापतींवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती

Next

राजगुरुनगर :  खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने या ठरावाला आज (ता. १० जून) स्थगिती दिली आहे अशी माहिती याचिकाकर्ते खेड पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य अमोल पवार यांनी दिली.

शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे  ३१ मे रोजी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती दिली व पुढील सुनावणी २६ जून रोजी होणार असल्याचे सांगितले.

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात संमत झालेल्या अविश्वास ठरावावर मतदान होताना पोखरकर यांच्या समर्थक दोन सदस्यांना सभागृहात जबरदस्तीने हात वर करायला सांगण्यात आल्याच्या मुद्यावर न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. याबाबतचे सभागृहातील व्हिडीओ चित्रिकरण न्यायालयात सादर करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण..? 

खेड पंचायत समिती मध्ये सेना, भाजप व काँग्रेसचे मिळुन १४ पैकी १० सदस्यांचे बहुमत आहे. शिवसेना व सहकारी पक्षांच्या सदस्यांमध्ये आपपसांत ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही. म्हणून सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या ६ सदस्यांनी बंड करून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावर चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. त्यात सेनेचे ६,भाजपचे उपसभापती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४ आशा ११ जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. भगवान पोखरकर यांच्या बाजूने ३ मते पडली होती.

सभापती पोखरकर व अन्य २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सभापती पोखरकर यांनी विरोधातील सदस्य एकत्रित पणे सहलीला गेल्यावर ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन मारहाण केली. तसेच यावेळी गोळीबार, विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. त्यावरून पोखरकर व अन्य २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे.या प्रकरणावरून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.पुढील सुनावणी २६ जुनला असुन त्यावेळी होणाऱ्या निर्णयावर राजकीय समीकरणे ठरणार आहे.

राष्ट्रवादी व शिवसेनेेत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी

सदस्यांवर झालेल्या हल्ल्याचे माजी खासदार व शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे सूत्रधार असुन त्यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ते   खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील याांनी केली होती. तर शिवसेनेच्या सदस्यांवर राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटील यांनी दबाव आणून हे प्रकरण घडविले असा आरोप सुरुवातीला आढळराव पाटील व नंतर खासदार संजय राऊत यांनी केला होता.

या निर्णयामुळे उत्सुकता..? 

अविश्वास ठरावानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ठरावाच्या बाजूने मतदान केलेले पंचायत समिती सदस्य, नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सहलीला गेलेले आहेत. या स्थगितीच्या निर्णयामुळे आता त्यांचा मुक्काम वाढणार की ते सहलीवरुन परत येणार, याबाबतही लोकांना उत्सुकता आहे.

Web Title: Relief to ShivSena in Khed! Postponement of no confidence motion against Panchayat Samiti Sabhapati post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.