पुणे : राज्यभरातील दुष्काळी भागातील रुग्णांना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व सदस्य असलेल्या डॉक्टरांकडून सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य शासनाने २६८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यातील काही अनेक तालुक्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्गासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या टंचाईबरोबरच आर्थिक स्थितीही कोलमडणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमए महाराष्ट्रने सर्व सदस्य डॉक्टरांना सवलतीच्या दरात उपचार करण्याचे आवाहन केले आहे. आयएमएच्या महाराष्ट्रात २१० शाखा असून, एकूण ४३ हजार ९० डॉक्टर्स सदस्य आहेत. संस्थेने विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेत राज्यभर काम केले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही सदस्य डॉक्टरांकडून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.‘आयएमए’ महाराष्ट्रच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये दुष्काळी भागातील रुग्णांना उपचारांमध्ये अधिकाधिक सवलत देण्याचे आवाहन सदस्यांना करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित रुग्णांना ते दुष्काळी भागातील असल्याची ओळख संबंधित डॉक्टरांना पटवून द्यायला हवी. त्यानंतर डॉक्टर्स त्यांच्या पातळीवर सवलत देतील. दुष्काळी भागातील रुग्णांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याचे संस्थेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
दुष्काळी भागातील रुग्णांना उपचारात सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 2:26 AM