नेरे/महर्षीनगर : एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ऐन दिवाळीच्या काळात बेमुदत संप पुकारला होता, यामुळे लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मात्र पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेण्यात आल्याने पाच दिवस बंदचा फायदा घेऊन खासगी वाहनांची झालेली चंगळ थांबली आहे.दिवाळीच्या सणाला जाणारे-येणारे प्रवासी, तालुक्याच्या ठिकाणी दिवाळीचा बाजार खरेदीसाठी येणारे ग्रामीण भागातील नागरिक यांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत होता. प्रवाशांची तारांबळ उडाली होती. या पाच दिवसांत खासगी वाहन चालक प्रवाशांची अक्षरश: लूट करीत असल्याची प्रवाशांमध्ये चर्चा चालू होती. खासगी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. प्रवासी मिळेल त्या वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे चित्र होते. एस. टी. कर्मचार्यांचा हा पुकारलेला संप रास्त असल्याचीही अनेकांची भावना होती. मात्र या संपामुळे बाजारपेठा, बसस्थानके ओस पडली होती.
सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एस. टी. वाहतुकीचा संप लवकरच मिटेल आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबतील, अशी अशा नागरिकांना, प्रवाशांना लागून राहिली होती. त्या प्रमाणेच पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कर्मचार्यांनी तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेतला आहे. शनिवार दि. २१ पहाटे पासून महामंडळाच्या एस. टी. बसेसची वाहतूक सुरळीत चालू झाली असल्याने खासगी वाहन चालकांच्या उत्त्पन्नात घट होऊन त्यांनी पाच दिवसात केलेली चंगळ थांबली आहे.
स्वारगेट बसस्थानक गजबजले प्रवाशांनी
रात्री ११ वाजल्यापासून एसटी बससेवा सुरू करण्यात आली. पहाटेच्या सर्व एसटी बससेवांची फेरी पूर्ण झाली. राज्य परिवहन मंडळाचे सर्व कर्मचारी कामावर रूजू होऊन, एसटी बस ठरवून दिलेल्या मार्गावर घेऊन जात होती. त्यामुळे चार दिवस प्रवाशांनी ओस पडलेले स्वारगेट बसस्थानक पुन्हा प्रवाशांनी गजबजून गेले होते. तत्काळ बुकिंगसाठी प्रवाशांनी तिकीट खिडकीवर रांग लावून गर्दी केली होती. भाऊबीज व शनिवार- रविवारच्या सुट्टीमुळे महिलाप्रवासीवर्गाची विशेष गर्दी दिसून येत होती. त्याचप्रमाणे आरक्षण रद्द करण्यासाठीही रांग दिसून येत होती. आज रद्द केलेल्या आरक्षणासाठी २५ टक्के रक्कम कमी करून मोबदला मिळत होता.