पुणे : भारतीय जनता पार्टीच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी भवन सुरू केल्यानंतर भाजपाने लगेचच हा निर्णय घेतला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अंतराचा विचार केला तर भाजपचं नवं कार्यालय राष्ट्रवादी भवनपासून जवळच आहे. भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र 'आम्ही राष्ट्रवादीपासून फार लांब आहोत व लांबच राहणार' असे उत्तर दिलं.
शनिवारवाडा ते महापालिका दरम्यानच्या रस्त्यावर एका इमारतीत हे नवं कार्यालय सुरू करण्यात आलं. नेते, पदाधिकारी वगळता भाजप कार्यकर्त्यांना याची पुरेशी कल्पना नव्हती असं दिसतं. कारण अचानकच हा निर्णय झाला अशी माहिती देण्यात आली.
कार्यालय बदलण्याचं कारण कळलं नाही
जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मानचा पहिला मजला भाजपा कार्यालय म्हणून वापरत होते. खासदार गिरीश बापट यांनी या जागेत कार्यालय आणलं. त्याआधी ते जोगेश्वरीच्या बोळामध्ये अप्पा बळवंत चौकात होतं. सन्मानमध्ये कार्यालय सुरू झाल्यापासून भाजपाच्या राजकीय यशाची पुण्यातील कमान नेहमी चढती राहिली अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. महापालिकेत प्रथमच स्वबळावर सत्ताही भाजपाला याच कार्यालयात असताना मिळाली. आता ते बदलण्याचे कारण कळत नाही असे काही कार्यकर्ते म्हणाले.
भाजपाचा शहरातील विस्तार लक्षात घेता, बैठका, गटमेळावे, गटचर्चा यासाठी मोठ्या जागेची गरज
हॉटेल सन्मानच्या संचालक मंडळाकडूनही याची विशेष माहिती मिळाली नाही. हे कार्यालय भाडे तत्वावरच होतं व नवे कार्यालयही भाडे तत्वावरच आहे. भाजपामधून खासदार बापट यांचे पुण्यातील वर्चस्व कमी केले जात असल्याचे सध्या बोलले जात असते. कोल्हापूरहून पुण्यात येऊन कोथरूडमधून आमदार झालेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यात स्वतंत्र गट तयार होतो आहे. कार्यालयाच्या स्थलांतरामागे अशा काही गोष्टी असाव्यात अशी चर्चा आहे. मुळीक यांनी मात्र याला नकार दिला. ती जागा कमी पडत होती. भाजपाचा शहरातील विस्तार लक्षात घेता, बैठका, गटमेळावे, गटचर्चा यासाठी मोठ्या जागेची गरज होती. त्यामुळे कार्यालय बदलाचा निर्णय घेण्यात आला. नव्या जागेत कार्यालय सुरू झाले असले तरी तिथे काही आवश्यक कामे करून घेतली जात आहेत. ती झाली की जाहीरपणे कार्यक्रम करून कार्यालय सुरू केले जाईल असे मुळीक यांनी सांगितले.