पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतर होणार म्हणून मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मोठं आंदोलन उभारले होते. याच आंदोलनाला यश आले आहे. रानडेतील एकत्रित केलेल्या दोन्ही विभागांचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे सुरू राहतील, असे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या माध्यम समन्वय कक्षाने शुक्रवारी (दि. १३) काढले आहे.
पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या. याबद्दल माध्यमातून उलटसुलट बातम्या येत आहेत. त्या वस्तूस्थितीला धरून नाही. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी वेळोवेळी भूमिका जाहीर केली आहे.
रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पूर्वीप्रमाणे पदविका अभ्यासक्रम (प्रवेश क्षमता १२०) सुरू राहिल. त्यासोबत नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर करिअर ओरियंटेड पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील ई. एम. एम. आर. सी व विद्यावाणी या संस्थांशी प्रशिक्षणासाठी जोडण्यात यावे. एम.सी.जे (प्रवेश क्षमता ३६) हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या मुख्य आवारात स्थलांतरीत करून त्यास स्टुडिओसहित सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. एकत्रित केलेल्या दोन्ही विभागांचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे सुरू राहतील, असे विद्यापीठाच्या माध्यम समन्वय कक्षाने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.