लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरू आहे. प्रशासनाने वितरणासाठी टास्क फोर्स स्थापन करूनही साठाच उपलब्ध नव्हता. त्यामुळे नागरिकांनी आंदोलनही केले. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी थेट दिल्लीतील निर्यात कंपनीकडून साडेतीन हजार रेमडेसिविर मागिवले. त्याचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात वितरणही करण्यात आले.
पुण्यातील अनेक रुग्णांना बुधवारी दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. गुरुवारी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पुणे जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख प्रयत्न करत होते. राज्य शासनाकडूनही रेमडेसिविर उपलब्ध करून दिले जात नव्हते. दिल्लीतील एका कंपनीकडे निर्यातीसाठीचा साठा शिल्लक असल्याची माहिती त्यांना मिळाली. या कंपनीशी त्यांनी थेट संपर्क साधला. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा थेट दिल्लीतून निर्यात साठ्यातील साडेतीन हजार रेमडेसिविर इंजेक्शन पुण्यात दाखल झाली.
पुण्यासह संपूर्ण राज्यातच सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु पुण्यात दररोज वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील मोठी आहे. पहिले दोन दिवस पुण्यासाठी सुमारे बारा हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध झाली. परंतु बुधवारी एकही रेमडेसिविर इंजेक्शन शासनाकडून अथवा यंत्रणेकडून पुण्यासाठी उपलब्ध झाले नाही. त्यात बहुतेक सर्व हाॅस्पिटल रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही तुमच्या पेशंटची जबाबदारी घेणार नाही, असे सांगून नातेवाईकांना भीती घालत आहेत. काही ठिकाणी रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज नसताना नातेवाईक आग्रह धरत आहे. यामुळेच सध्या पुण्यात आवश्यक तेवढी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
------
शासनाच्या वितरण व्यवस्थेतून रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. प्रोटेक्ट लाईफ सायन्स ही कंपनी रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात करते व त्यांच्याकडे साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. ही बाब विभागीय आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा केली आणि दिल्लीतून हा साठा पुण्यात आणला.
डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी