वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील एका हॉस्पिटलजवळ असलेल्या मेडिकलमधून रेमडेसिविर इंजेक्शन या औषधांचा काळा बाजार सुरु असल्याची चर्चा आहे. वाघोली परिसरात कोरोना गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असताना ठराविक मेडिकल व काही हॉस्पिटल यांच्याकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ करत नागरिकांच्या पैश्याची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच असाच काहीसा प्रकार वाघोली परिसरात समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की वाडेबोल्हाई येथील योगेश गायकवाड यांनी एका मेडिकल चालकाच्या नातेवाईकाला फोन करून मेडिकलमधून कोरोना रुग्णासाठी 'रेमडेसिविर' इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या इंजेक्शनसाठी संबंधित मेडिकल चालकांकडून जास्तीचे पैसे आकारले असल्याची गायकवाड यांचे म्हणणे असल्याची चर्चा आहे. या बाबतीत योगेश गायकवाड यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
***************
आमच्या मेडिकलमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या औषधासाठी जास्तीचे पैसे आकारले जात नाहीत परंतु समाजात जाणूनबुजून माझी बदनामी करत आहेत. प्रशासनाने पुराव्यानिशी योग्य ती चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करावी .
चंद्रकांत देशमुख, आय मॅक्स मेडिकल स्टोअर, वाघोली
***************
वाघोली परिसरामध्ये मेडिकल चालकाकडून रेमडेसिविर हे औषध जास्त दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
डॉ. सचिन खरात, तालुका आरोग्य अधिकारी हवेली
***************
जर अशा प्रकार घडत असेल तर प्रशासनाने योग्य पुराव्यानिशी चौकशी करून कारवाई करावी, परंतु संबंधित मेडिकलबाबत माहिती घेतली असता असा कोणताही प्रकार घडलेला नाही.
चंद्रकांत वारघडे, माहिती सेवा समिती,अध्यक्ष म.राज्य